अहिल्यानगर: पत्नीसोबत झालेल्या भांडणाचा राग मनात धरून एका बापाने आपल्या चार लहान मुलांसह स्वतःचे जीवन संपवल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील केलवड-कोऱ्हाळे गावात ही थरकाप उडवणारी घटना घडली असून, एकाच कुटुंबातील पाच जणांचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले आहेत. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे.
अरुण काळे (वय ३५) असे या पित्याचे नाव असून, त्याने आपली ८ वर्षांची मुलगी शिवानी आणि तीन लहान मुले प्रेम, वीर आणि कबीर यांना विहिरीत ढकलून दिले आणि त्यानंतर स्वतःही आत्महत्या केली. पोलिसांच्या प्राथमिक तपासात कौटुंबिक वादातून हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे.
अहिल्यानगर मधील थरकाप उडवणारी घटना कशी उघडकीस आली?
शनिवार, १६ ऑगस्ट रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास कोऱ्हाळे गावातील एका शेतातील विहिरीवर गेलेल्या दोन मेंढपाळांना पाण्यावर एका लहान मुलीचा मृतदेह तरंगताना दिसला. त्यांनी तातडीने गावचे पोलीस पाटील सुरेश गमे यांना माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून राहाता पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण आणि पोलीस उपाधीक्षक शिरीश वमने तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांना विहिरीजवळ एक संशयास्पद दुचाकी आढळून आली. गाडीची माहिती काढली असता, ती शीला अरुण काळे यांच्या नावावर असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी शीला काळे यांना फोन लावला असता, “ही गाडी माझ्या नवऱ्याची असून, तो १५ ऑगस्टपासून माझ्या चार मुलांना घेऊन बेपत्ता आहे,” अशी धक्कादायक माहिती त्यांनी दिली.
आठ तासांचे थरारक शोधकार्य
शीला यांनी दिलेल्या माहितीमुळे पोलिसांचा संशय बळावला. एका मुलीचा मृतदेह सापडल्याने, वडील अरुण आणि इतर तीन मुलांचा शोध सुरू झाला. पोलिसांना इतर मृतदेहही विहिरीतच असल्याचा संशय आल्याने शिर्डी आणि राहाता नगरपरिषदेच्या आपत्ती निवारण पथकाला पाचारण करण्यात आले.
सुमारे ४० फूट खोल असलेल्या या विहिरीतून मृतदेह बाहेर काढणे अत्यंत आव्हानात्मक होते. दुपारी एक वाजता सुरू झालेले हे शोधकार्य रात्री साडेआठ वाजेपर्यंत चालले. काही वेळाने आणखी दोन मुलांचे मृतदेह तरंगताना दिसले, पण ते पुन्हा पाण्यात बुडाले. अखेर गावकऱ्यांच्या मदतीने एका खाटेला दोरी बांधून विहिरीत सोडून शोध सुरू झाला. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास वडील अरुण काळे यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्याचे हात आणि पाय दोरीने बांधलेल्या अवस्थेत होते. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत इतर तीन मुलांचे मृतदेहही बाहेर काढण्यात आले.
कौटुंबिक वादातून टोकाचे पाऊल
पोलिसांनी केलेल्या तपासात या घटनेमागे कौटुंबिक वादाचे कारण असल्याचे समोर आले आहे. अरुण काळे आणि त्याची पत्नी शीला यांच्यात नेहमीच भांडणे होत असत. अरुण तिला मारहाण करायचा. आठवड्याभरापूर्वी वाद विकोपाला गेल्याने ४ ऑगस्ट रोजी शीला आपल्या दोन मुलांना घेऊन रागाच्या भरात येवला येथे माहेरी निघून गेली होती.
११ ऑगस्ट रोजी अरुणने येवल्याला जाऊन त्या दोन मुलांनाही इतर दोन मुलांसोबत आश्रमशाळेत टाकले. त्याने शीलाला घरी परत येण्याची विनंती केली, पण तिने नकार दिला.
तो काळा दिवस…
१५ ऑगस्ट रोजी अरुणने शीलाला फोन करून धमकी दिली, “तू जर घरी परत आली नाहीस, तर मी चारही मुलांसोबत स्वतःला संपवून टाकेन.” शीलाने या धमकीला नेहमीप्रमाणेच समजले, पण तिने आश्रमशाळेत फोन करून मुलांना वडिलांच्या ताब्यात न देण्याची सूचना केली. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता.
अरुण “सुट्टी असल्याने मुलांना आईकडे नेतो आणि त्यांचे केस कापून आणतो,” असे खोटे कारण सांगून चारही मुलांना आश्रमशाळेतून घेऊन गेला होता. वाटेत त्याने शीलाला फोन करण्याचा प्रयत्न केला, पण तिने त्याचा नंबर ब्लॉक केला होता. पत्नीने फोन ब्लॉक केल्याने संतापलेल्या अरुणने थेट कोऱ्हाळे गाव गाठले आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या एका शेतातील विहिरीजवळ गाडी थांबवली. कसलाही विचार न करता त्याने एकामागून एक आपल्या चारही पोटच्या मुलांना विहिरीत ढकलून दिले आणि त्यानंतर स्वतःचे हातपाय दोरीने बांधून विहिरीत उडी घेतली.
पोलिसांच्या प्राथमिक तपासात पत्नीच्या रागातून अरुणने हे अमानुष कृत्य केल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. मात्र, यामागे आणखी काही कारण आहे का, याचा पोलीस अधिक तपास करत आहेत.