बीड: प्रेम प्रकरणाच्या वादातून एका होमगार्ड तरुणीची तिच्याच मैत्रिणीने मुलाच्या मदतीने थंड डोक्याने हत्या केल्याची धक्कादायक घटना बीड जिल्ह्यात उघडकीस आली आहे. अयोध्या राहुल भरकटे (वय २६) असे हत्या झालेल्या तरुणीचे नाव असून, या प्रकरणी पोलिसांनी मुख्य संशयित आरोपी वृंदावनी खरमाडे हिच्यासह अन्य तिघांना अटक केली आहे. मृतदेह एका बॉक्समध्ये बंद करून नाल्यात फेकून देण्यात आला होता.
बीड हत्या नेमके प्रकरण काय?
बीड जिल्ह्यातील वासनवाडीजवळील पांगरी गावाजवळच्या एका नाल्यातून दुर्गंधी येत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास केला असता, त्यांना एक संशयास्पद बॉक्स आढळून आला. बॉक्स उघडताच सर्वांनाच धक्का बसला, कारण त्यात एका महिलेचा छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह होता.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अयोध्या भरकटे नावाची तरुणी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल झाली होती. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत मृतदेहाची ओळख पटवली असता, तो मृतदेह अयोध्या यांचाच असल्याचे निष्पन्न झाले.

प्रेम त्रिकोण ठरला हत्येचे कारण
पोलिसांनी केलेल्या सखोल तपासात या हत्येमागे प्रेम त्रिकोणाचे कारण असल्याचे समोर आले. अयोध्या आणि तिची मैत्रीण वृंदावनी खरमाडे या दोघींचेही राठोड आडनावाच्या एकाच तरुणासोबत प्रेमसंबंध होते. आपल्या प्रियकराची अयोध्यासोबत वाढणारी जवळीक वृंदावनीला सहन झाली नाही. याच रागातून तिने अयोध्याच्या हत्येचा कट रचला.
असा रचला हत्येचा कट
वृंदावनीने अयोध्याला आपल्या घरी राहण्यासाठी बोलावले. मैत्रीवर विश्वास ठेवून अयोध्या तिच्या घरी गेली. रात्रीच्या वेळी वृंदावनीने अयोध्याला गुंगीचे औषध दिले. अयोध्या बेशुद्ध झाल्यानंतर वृंदावनीने आपल्या मुलाच्या मदतीने तिचा गळा दाबून खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह एका बॉक्समध्ये भरून तो रात्रीच्या अंधारात वासनवाडीजवळील नाल्यात फेकून दिला.
पोलिसांनी आवळल्या मुसक्या
स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे हा गुन्हा उघडकीस आला. पोलिसांनी तातडीने तपास करत मुख्य आरोपी वृंदावनी खरमाडे आणि तिच्या मुलासह गुन्ह्यात मदत करणाऱ्या अन्य तिघांनाही अटक केली आहे. वृंदावनीने गुन्ह्याची कबुली दिली असून, पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
अयोध्याचे पोलीस होण्याचे स्वप्न राहिले अधुरे
मृत अयोध्या भरकटे या मूळच्या गेवराई तालुक्यातील लुखासमला गावच्या होत्या. पतीच्या अपघाती निधनानंतर त्या आपल्या तीन वर्षांच्या मुलीला सासरी सोडून बीडमध्ये पोलीस भरतीची तयारी करत होत्या. होमगार्ड म्हणून रुजू झाल्यानंतरही पोलीस होण्याचे त्यांचे स्वप्न होते. मात्र, मैत्रीच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळे त्यांचे स्वप्न अधुरेच राहिले. या घटनेमुळे बीड जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.