Bihar – पूर्णिया बिहार : पूर्णिया जिल्ह्यातील टेडगामा गावात अंधश्रद्धेचा क्रूर खेळ. जमावाच्या तावडीतून १६ वर्षांचा मुलगा निसटला आणि त्यानेच पोलिसांना या भयंकर घटनेची माहिती दिली.
पूर्णिया, बिहार: बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यातील आदिवासीबहुल टेडगामा गावात अंधश्रद्धेतून एक अत्यंत अमानुष आणि क्रूर घटना घडली आहे. चेटकिणीच्या संशयावरून, गावातील पंचायतीने एकाच कुटुंबातील पाच जणांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली. त्यानंतर सुमारे ३०० लोकांच्या जमावाने या कुटुंबाला अमानुष मारहाण करून जिवंत जाळले. ही धक्कादायक घटना ६ जुलैच्या रात्री घडली. या हत्याकांडातून कुटुंबातील एक १६ वर्षांचा मुलगा बचावला असून, त्यानेच पोलिसांना या संपूर्ण प्रकाराची माहिती दिली, त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
टेडगामा गावात बाबूलाल ओराव यांचे कुटुंब राहत होते. ते गावात झाडफूक आणि तंत्र-मंत्राचे काम करत असत, त्यामुळे गावातील लोक त्यांच्याकडे समस्या घेऊन येत असत. याच गावातील रामदेव महतो यांचा मुलगा आजारी होता. अनेक उपचार करूनही तो बरा होत नव्हता. रामदेवने बाबूलाल यांच्याकडे धाव घेतली, पण उपचारादरम्यान त्याच्या मुलाचा ३ जुलै रोजी मृत्यू झाला. यानंतर रामदेवचा दुसरा मुलगाही आजारी पडला.
याच दरम्यान, गावातील नकुल ओराव नावाच्या व्यक्तीने गावात अफवा पसरवली की, बाबूलालची पत्नी, आई आणि सून या चेटकिणी आहेत आणि त्यांच्या वाईट नजरेमुळेच गावात आजारपण पसरले आहे आणि रामदेवच्या मुलाचा मृत्यू झाला. रामदेवच्या मुलाचा मृत्यू आणि गावात पसरलेली भीती यामुळे गावकऱ्यांनी नकुलच्या बोलण्यावर विश्वास ठेवला.
६ जुलैची ती भयानक रात्र
६ जुलैच्या रात्री सुमारे १० वाजता, गावातील लोकांचा एक मोठा जमाव बाबूलालच्या घराबाहेर जमला. त्यांनी बाबूलाल, त्यांची पत्नी सीता देवी, आई, मुलगा मंजित, सून राणी देवी आणि १६ वर्षांचा मुलगा सोनू या सर्वांना घराबाहेर खेचले आणि बेदम मारहाण सुरू केली. कुटुंबाला घरापासून सुमारे दीड किलोमीटर फरफटत नेऊन एका झाडाला बांधण्यात आले.
त्याच ठिकाणी रात्री उशिरा टेडगामा आणि आसपासच्या दोन गावांतील लोकांची पंचायत भरवण्यात आली. जवळपास ३०० लोकांच्या उपस्थितीत दोन ते तीन तास चाललेल्या या पंचायतीने बाबूलालच्या कुटुंबाला गावातील सर्व समस्यांसाठी जबाबदार धरले आणि सर्वांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली. रात्री १ वाजण्याच्या सुमारास, जमावाने बाबूलाल, त्यांची पत्नी, आई, मुलगा आणि सून अशा पाच जणांवर पेट्रोल टाकून त्यांना जिवंत जाळले.
१६ वर्षांच्या मुलाची सुटका आणि पोलिसांची कारवाई
या संपूर्ण क्रूर प्रकारातून बाबूलाल यांचा १६ वर्षांचा मुलगा सोनू कसातरी निसटला. जीव वाचवण्यासाठी तो अंधारात पळत सुटला आणि सुमारे चार किलोमीटर दूर असलेल्या आपल्या आजोळी पोहोचला. तिथे त्याने नातेवाईकांना घडलेला प्रकार सांगितला आणि त्यांच्या मदतीने पोलिसांशी संपर्क साधला.
घटनेची माहिती मिळताच पोलीस टेडगामा गावात पोहोचले, पण तोपर्यंत गाव पूर्णपणे रिकामे झाले होते. गावकरी भीतीने पळून गेले होते. पोलिसांना सोनूच्या कुटुंबातील पाच जणांचे अर्धवट जळालेले मृतदेह एका तलावाजवळ पोत्यात भरलेले आढळले.
पोलिसांच्या तपासात असे समोर आले आहे की, या हत्येपूर्वी घटनास्थळी दारूची पार्टी झाली होती. पोलिसांनी या प्रकरणी मुख्य सूत्रधार नकुल ओरावसह काही जणांना अटक केली आहे. एकूण २३ ज्ञात आणि १५० अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
अंधश्रद्धा आणि शिक्षणाचा अभाव
टेडगामा गावात सुमारे ४० कुटुंबे राहतात आणि त्यातील बहुतेक अशिक्षित आहेत. गावात आरोग्याच्या समस्यांवर डॉक्टरांऐवजी झाडफूक आणि तंत्र-मंत्रावर अधिक विश्वास ठेवला जातो. याच अंधश्रद्धेमुळे आधी रामदेवच्या मुलाचा जीव गेला आणि त्यानंतर पसरलेल्या अफवेमुळे बाबूलालच्या संपूर्ण कुटुंबाचा बळी गेला. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचे आणि तणावाचे वातावरण आहे.