रत्नागिरी: चिपळूण तालुक्यातील धामणवणे गावात एका निवृत्त शिक्षिकेची त्यांच्याच घरात हात-पाय बांधून निर्घृun हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वर्षा वासुदेव जोशी (वय ६३) असे मृत शिक्षिकेचे नाव आहे. या घटनेमुळे शांत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिपळूण परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. चोरीच्या उद्देशाने ही हत्या झाली की मालमत्तेच्या वादातून, याचा तपास पोलीस करत आहेत.
वर्षा जोशी यांच्या हत्येचा असा उघडकीस आला प्रकार
वर्षा जोशी या गुरुवारी, ७ ऑगस्ट रोजी आपल्या मैत्रिणींसोबत हैदराबादला फिरायला जाणार होत्या. त्यांची सर्व तयारी झाली होती. मात्र, बुधवारी रात्रीपासून त्यांच्या मैत्रिणी त्यांना फोन करत असताना कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता. गुरुवारी सकाळीही अनेकदा फोन करूनही उत्तर न आल्याने त्यांच्या मैत्रिणीला चिंता वाटू लागली.
त्यांनी तात्काळ जोशी यांच्या शेजारी राहणाऱ्या शिरीश चौधरी यांना संपर्क साधून घरी जाऊन पाहण्यास सांगितले. चौधरी यांनी जोशी यांच्या घरी जाऊन पाहिले असता घराचा पुढचा दरवाजा बंद होता, मात्र मागचा दरवाजा उघडा दिसला. त्यांनी इतर ग्रामस्थांना बोलावून आत प्रवेश केला असता, त्यांना वर्षा जोशी हात-पाय बांधलेल्या अवस्थेत मृतावस्थेत आढळल्या. यानंतर गावकऱ्यांनी तात्काळ चिपळूण पोलिसांना घटनेची माहिती दिली.
पोलिसांचा तपास आणि संशयाची सुई
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की, जोशी यांचे हात-पाय घट्ट बांधलेले होते आणि त्यांच्या चेहऱ्यावर व शरीरावर जखमांच्या खुणा होत्या. घरात चोरीच्या उद्देशाने कोणीतरी प्रवेश करून ही हत्या केली असावा, असा सुरुवातीला अंदाज होता. मात्र, जोशी यांच्या अंगावरील दागिने जसेच्या तसे असल्याने हा संशय कमी झाला आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, आरोपींनी घरातील सीसीटीव्हीचा डीव्हीआर (DVR) गायब केला आहे, ज्यामुळे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाल्याचे स्पष्ट होते. यामुळे आरोपी जोशी यांच्या ओळखीचाच असावा आणि त्याला घरातील सीसीटीव्हीची माहिती असावी, असा पोलिसांचा कयास आहे. या दिशेनेही तपास सुरू असून, मालमत्तेच्या वादातून ही हत्या झाली असण्याची शक्यताही पोलीस पडताळून पाहत आहेत.
तपासासाठी विविध पथके तैनात
चिपळूणचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींचा शोध घेण्यासाठी विविध पथके स्थापन करण्यात आली आहेत. फॉरेन्सिक आणि ठसे तज्ज्ञांच्या मदतीने पुरावे गोळा केले जात आहेत. श्वान पथकाने घराच्या मागच्या दरवाज्यातून जवळच्या जंगलाच्या दिशेने धाव घेतल्याने, आरोपी जंगलात पळून गेल्याचा अंदाज आहे.
वर्षा जोशी या जिल्हा परिषदेच्या शाळेतून शिक्षिका म्हणून सेवानिवृत्त झाल्या होत्या. पतीच्या निधनानंतर आणि मुलबाळ नसल्याने त्या घरात एकट्याच राहत होत्या. त्यांच्या मृत्यूने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणातील गूढ उकलण्याचे मोठे आव्हान सध्या पोलिसांसमोर आहे.