पुणे: शहरात गणेश विसर्जनाच्या उत्साहाची तयारी सुरू असताना, नाना पेठेसारख्या गजबजलेल्या परिसरात शुक्रवारी रात्री एका तरुणाची गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली. आयुष कोमकर असे मृत तरुणाचे नाव असून, या घटनेमुळे संपूर्ण शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी ही हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात असून, या प्रकरणी पोलिसांनी आंदेकर टोळीचे प्रमुख बंडू आंदेकर यांच्यासह ११ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे पुण्यात पुन्हा एकदा टोळीयुद्धाला सुरुवात झाली आहे का, अशी चर्चा जोर धरू लागली आहे.
आयुष कोमकर सोबत नेमके काय घडले?
नाना पेठेतील लक्ष्मी कॉम्प्लेक्समध्ये राहणारा आयुष कोमकर शुक्रवारी रात्री पावणेआठच्या सुमारास क्लासवरून घरी परतला होता. इमारतीच्या पार्किंगमध्ये गाडी लावत असताना, दबा धरून बसलेल्या अमन खान आणि यश पाटील नावाच्या दोन आरोपींनी त्याच्यावर पिस्तुलातून गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात आयुषचा जागीच मृत्यू झाला आणि आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.
घटनेनंतर आयुषची आई कल्याणी गणेश कोमकर यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आंदेकर टोळीचे प्रमुख बंडू अण्णा आंदेकर, त्यांचा मुलगा कृष्णा आंदेकर, पुतण्या शिव आंदेकर, नातू स्वराज वाडेकर, तुषार वाडेकर, अभिषेक आंदेकर, शिवराज आंदेकर, वृंदावनी वाडेकर, लक्ष्मी आंदेकर, तसेच गोळ्या झाडणारे अमन युसूफ पठाण उर्फ खान आणि यश सिद्धेश्वर पाटील यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.

हत्येमागे बदलाचे राजकारण?
वनराज आंदेकर यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठीच आयुषची हत्या करण्यात आल्याचे बोलले जात आहे. आयुषचे वडील गणेश कोमकर हे वनराज आंदेकर हत्या प्रकरणात आरोपी असून सध्या तुरुंगात आहेत. त्यामुळे “मुलाच्या हत्येचा बदला नातवाला संपवून घेतला का?” अशी चर्चा सुरू झाली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा वेगाने तपास करत अमन खान आणि यश पाटील या दोन मुख्य आरोपींना अटक केली असून, त्यांची चौकशी सुरू आहे.
टिपू पठाण टोळीचे कनेक्शन
पोलिसांच्या तपासात या हत्येमध्ये टिपू पठाण टोळीचा सहभाग असल्याचेही समोर आले आहे. आयुषच्या हत्येसाठी वापरण्यात आलेले पिस्तूल टिपू पठाण टोळीच्या सदस्यांनी पुरवल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी टिपू पठाण टोळीचे सदस्य आस मोहम्मद खान उर्फ आरिफ आणि युनुस जलील खान या दोघांनाही ताब्यात घेतले आहे. शस्त्र पुरवण्याव्यतिरिक्त या टोळीचा या प्रकरणात आणखी काय सहभाग आहे, याचा पोलीस तपास करत आहेत.
पोलिसांची कारवाई आणि पुढील तपास
आयुषच्या हत्येपूर्वीच भारती विद्यापीठ पोलिसांनी आंदेकर टोळीवर मोठी कारवाई करत वनराज आंदेकर यांच्या हत्येचा बदला घेण्याचा कट उधळून लावला होता. दत्ता काळे नावाच्या तरुणाला या कटाच्या संदर्भात अटकही करण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही आंदेकर टोळीने आपला डाव साधत आयुषची हत्या केली.
सध्या पुणे पोलीस सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या चौकशीतून या हत्येमागे आणखी कोण सहभागी आहे आणि या टोळीयुद्धाची पाळेमुळे किती खोलवर रुजली आहेत, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.