उमरी (नांदेड): आपल्या विवाहित मुलीला तिच्या प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिल्यानंतर संतापलेल्या बापाने दोघांचीही निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यात घडली आहे. मारुती सुरवसे असे आरोपी पित्याचे नाव असून, त्याने आपली मुलगी संजीवनी आणि तिचा प्रियकर लखन भंडारे या दोघांना विहिरीत ढकलून जीव घेतला. धक्कादायक म्हणजे, हे क्रूर कृत्य केल्यानंतर आरोपी बापाने स्वतः पोलीस ठाण्यात हजर होऊन गुन्ह्याची कबुली दिली.

उमरी दुहेरी हत्याकांड ? नेमके काय घडले?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मारुती सुरवसे हा उमरी पोलीस ठाण्यात हजर झाला. “मी माझ्या मुलीला संपवले आहे आणि तिचा मृतदेह ‘त्या’ विहिरीत आहे,” अशी थंड रक्ताने त्याने कबुली दिली. हे ऐकून पोलीसही चक्रावून गेले.
मारुती सुरवसे यांची मुलगी संजीवनी हिचा विवाह एका वर्षापूर्वी जवळच्याच गोळेगाव येथील सुधाकर नावाच्या तरुणासोबत झाला होता. मात्र, लग्नापूर्वी तिचे गावातीलच लखन भंडारे याच्यासोबत प्रेमसंबंध होते. घरच्यांच्या विरोमुळे हे संबंध संपुष्टात आले होते, मात्र लग्नानंतरही संजीवनी आणि लखन एकमेकांच्या संपर्कात होते.
२५ ऑगस्ट रोजी संजीवनीचा पती आणि सासरची मंडळी कामानिमित्त बाहेर गेली होती. ही संधी साधून संजीवनीने प्रियकर लखनला घरी बोलावले. मात्र, तिचे सासरचे लोक वेळेपूर्वीच घरी परतले आणि त्यांनी संजीवनी व लखन यांना आक्षेपार्ह अवस्थेत रंगेहाथ पकडले.
अपमानाचा बदला हत्येत
हा प्रकार पाहून संतापलेल्या सासरच्यांनी दोघांनाही दोरीने बांधून मारहाण केली आणि तात्काळ संजीवनीचे वडील मारुती सुरवसे यांना बोलावून घेतले. आपल्या मुलीमुळे झालेल्या या अपमानास्पद प्रकाराने मारुतीचा संताप अनावर झाला. सासरच्यांनी संजीवनीला नांदवण्यास नकार देत तिला मारुतीसोबत परत पाठवले.
गावी परतत असताना वाटेतच मारुतीने संजीवनी आणि लखन यांना एका निर्जनस्थळी असलेल्या विहिरीजवळ नेले. दोघांचे हात आधीच बांधलेले होते. त्या अवस्थेतच त्याने दोघांना जबर मारहाण केली आणि जिवंतपणीच विहिरीत ढकलून दिले.
आरोपी स्वतःहून पोलिसात हजर
मुलीची आणि तिच्या प्रियकराची हत्या केल्यानंतर अपराधीपणाची भावना असह्य झाल्याने मारुती थेट उमरी पोलीस ठाण्यात पोहोचला आणि त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. विहीर पाण्याने भरलेली असल्याने आणि अंधारामुळे मृतदेह बाहेर काढण्यात अडथळे येत होते. अखेर, मध्यरात्री दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास संजीवनी आणि त्यानंतर लखनचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला.
याप्रकरणी उमरी पोलिसांनी आरोपी मारुती सुरवसे याला अटक केली असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक अंकुश माने आणि त्यांचे पथक करत आहे. ऐन तारुण्यातील विवाहित मुलीला तिच्या प्रियकरासह जन्मदात्या बापानेच संपवल्याच्या या घटनेने संपूर्ण नांदेड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.