मुंबई: आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शुक्रवारी दादर येथील शिवसेना भवनात एक ऐतिहासिक दृश्य पाहायला मिळाले. आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे या दोन बंधूंनी एकत्र येत मुंबईतील उमेदवारांना मार्गदर्शन केले आणि महापालिका निवडणुकीसाठी आपला संयुक्त जाहीरनामा प्रसिद्ध केला. या जाहीरनाम्यात महिला, युवक आणि पायाभूत सुविधांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या असून, ‘लाडकी बहीण’ योजनेला टक्कर देण्यासाठी ठाकरे बंधूंनी ‘स्वाभिमान निधी’चे अस्त्र बाहेर काढले आहे.

जाहीरनाम्यातील प्रमुख घोषणा: मुंबईकरांसाठी काय आहे खास?
आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी संयुक्तपणे १६ मुद्द्यांचे प्रेझेंटेशन सादर केले. यामध्ये मुंबईच्या सर्वांगीण विकासाचा आराखडा मांडण्यात आला आहे:
मुंबई महानगरपालिका
-
महिलांसाठी १५०० रुपये ‘स्वाभिमान निधी’: सत्तेत आल्यास मुंबईतील घरकाम करणाऱ्या महिलांची नोंदणी केली जाईल आणि त्यांना दरमहा १५०० रुपये स्वाभिमान निधी दिला जाईल.
-
परवडणारी घरे: महापालिकेच्या जमिनी बिल्डरांच्या घशात न घालता, तिथे पालिकेचे कर्मचारी, पोलीस आणि गिरणी कामगारांना हक्काची घरे दिली जातील. पुढील ५ वर्षांत १ लाख परवडणारी घरे देण्याचे आश्वासन दिले आहे.
-
मोफत शिक्षण आणि आरोग्य: पालिकेच्या शाळांमध्ये १२ वी पर्यंत ज्युनियर कॉलेज सुरू करणे, ५ नवीन मेडिकल कॉलेज आणि मुंबईचे स्वतःचे कॅन्सर रुग्णालय उभारण्याचे वचन दिले आहे.
-
वाहतूक आणि पायाभूत सुविधा: बेस्ट बसचे तिकीट दर १०, १५, २० रुपये (फ्लॅट रेट) करणे, १० हजार इलेक्ट्रिक बसेस ताफ्यात आणणे आणि ७०० स्क्वेअर फूटपर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर (Property Tax) माफ करणे.
-
स्वयंरोजगार: १ लाख तरुण-तरुणींना २५ हजार ते १ लाख रुपयांचा स्वयंरोजगार निधी आणि डबेवाले-गिग वर्कर्सना ई-बाईकसाठी बिनव्याजी कर्ज.
उद्धव ठाकरेचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे यांनी उमेदवारांना संबोधित करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कडाडून टीका केली. “जशी लढाई मुघलांबरोबर झाली, तशीच ही लढाई मुंबईसाठी आहे. सूर्याजी पिसाळचा गद्दारीचा टिळा ४०० वर्षांनंतरही पुसला गेला नाही, तसाच ‘मिंधेंचा’ हा गद्दारीचा डाग कायम लक्षात राहील,” असे ते म्हणाले. मुंबई दोन गुजरातच्या हातात देऊ नका, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
१५०० रुपये ठरणार का ‘गेम चेंजर’?
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला ‘लाडकी बहीण’ योजनेचा मोठा फायदा झाला होता. मुंबईत एकूण १ कोटी ३ लाख मतदारांपैकी सुमारे ४८ लाख महिला मतदार आहेत. गेल्या काही वर्षांत महिला मतदानाची टक्केवारी लक्षणीय वाढली आहे. हीच ‘वोट बँक’ लक्षात घेऊन ठाकरे बंधूंनी महिलांसाठी विशेष योजना जाहीर केल्या आहेत.
ठाकरे बंधूंच्या या रणनीतीमुळे मुंबई महापालिकेची लढाई आता अधिक चुरशीची झाली आहे. महायुतीची ‘लाडकी बहीण’ की ठाकरेंचा ‘स्वाभिमान निधी’, मुंबईच्या महिला कोणाच्या पारड्यात आपले मत टाकतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
तुमच्या मते ठाकरेंची ही घोषणा निवडणुकीत गेम चेंजर ठरेल का? आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा.