सापांशी मैत्री, गुहेत मुलीला जन्म… कर्नाटकातील रशियन महिलेच्या गूढ कहाणीने देशात खळबळ!
गोकर्ण, कर्नाटक: घनदाट जंगल, जंगली श्वापदांचा वावर आणि जवळ मानवी वस्तीचा लवलेशही नाही… कर्नाटकच्या गोकर्णमधील रामतीर्थ डोंगराच्या अशा दुर्गम भागातील एका गुहेत दोन लहान मुलींसोबत राहणाऱ्या एका रशियन महिलेला पोलिसांनी शोधून काढले आहे. ११ जुलै रोजी गस्त घालत असलेल्या पोलिसांना ही महिला आढळली. या ‘सुटके’नंतर महिलेने केलेले धक्कादायक दावे, तिच्या मुलांचे गूढ आणि तिच्या इस्रायली पतीने सुरू केलेल्या कायदेशीर लढाईमुळे ही घटना देशपातळीवर चर्चेचा विषय बनली आहे.
असा लागला शोध
गोकर्ण पोलिसांचे एक पथक शुक्रवारी, ११ जुलै रोजी रामतीर्थ डोंगराच्या भूस्खलन झालेल्या भागात गस्तीवर होते. त्यावेळी त्यांना एका गुहेबाहेर वाळत घातलेले कपडे दिसले. संशयावरून पोलीस आत गेले असता, त्यांना एक परदेशी महिला आणि तिच्यासोबत दोन लहान मुली आढळून आल्या. सुरुवातीला माहिती देण्यास टाळाटाळ करणाऱ्या या महिलेशी संवाद साधण्यासाठी पोलिसांनी एका स्थानिक साध्वीची मदत घेतली. त्यानंतर या महिलेला आणि तिच्या मुलींना सुरक्षितरित्या बाहेर काढून साध्वीच्या आश्रमात हलवण्यात आले. तपासात ही महिला बेकायदेशीरपणे भारतात राहत असल्याचे स्पष्ट झाले.
कोण आहे निना कुटिना? धक्कादायक दावे आणि मुलांचे गूढ
पोलिसांनी केलेल्या चौकशीत या महिलेचे नाव निना कुटिना असून ती रशियाच्या सेंट पीटर्सबर्गची रहिवासी असल्याचे समोर आले. ती ऑक्टोबर २०१६ मध्ये बिझनेस व्हिसावर भारतात आली होती. त्यावेळी तिच्यासोबत दोन मुले आणि एक मुलगी होती, अशी सरकारी नोंदींमध्ये माहिती आहे. व्हिसाची मुदत संपल्यानंतर तिने देश सोडला, पण रशियाला न जाता ती नेपाळला गेली आणि तिथून पुन्हा बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश केला.
पोलिसांना ती सापडली तेव्हा तिच्यासोबत दोन मुली होत्या. तिच्या मुलांबद्दल विचारले असता, निनाने अनेक धक्कादायक दावे केले:
- गुहेत मुलीला जन्म: निनाने दावा केला की, तिच्यासोबत असलेल्या सर्वात लहान मुलीला (अमा) तिने गोव्यातील एका गुहेत कोणाच्याही मदतीशिवाय स्वतः जन्म दिला आहे.
- मुलांचा मृत्यू आणि गूढ: तिच्या २१ वर्षांच्या मोठ्या मुलाचा गेल्या वर्षी एका बाईक अपघातात मृत्यू झाला आणि त्याच्या अस्थी याच गुहेत होत्या, ज्या पोलिसांच्या कारवाईत गहाळ झाल्याचा दावा तिने केला. तर, तिचा ११ वर्षांचा मुलगा कुठे आहे, याबद्दल पोलिसांना अद्याप ठोस माहिती मिळालेली नाही.
जंगली श्वापदांमध्ये गुहेतील आयुष्य
ज्या गुहेत निना राहत होती, तिथे विषारी सापांचा वावर होता. मात्र, निनाच्या मते, “साप आमचे मित्र होते, ते आमच्या घराचाच भाग होते. आम्ही त्यांना त्रास दिला नाही, त्यामुळे त्यांनीही आम्हाला कधी त्रास दिला नाही.” गुहेत पोलिसांना प्लास्टिकच्या शीट्स, फळे, वनस्पती, इन्स्टंट नूडल्सची पाकिटे आणि काही नाणी सापडली. निनाने सांगितले की, ती जवळच्या गावात वनस्पती आणि तिने बनवलेली ‘क्ले आर्ट’ विकून पैसे कमवायची. पैसे संपल्यास तिचे वडील, भाऊ किंवा मुलगा तिला पैसे पाठवायचे.
तिच्या मते, “गुहा हे आमचं घर होतं. माझ्या मुली इथे आनंदात होत्या. आम्ही नदीत पोहायचो, धबधब्याचा आनंद घ्यायचो. मी त्यांना शिकवत होते आणि त्यांचे होमस्कूलिंग करणार होते. आमचं आयुष्य सुरळीत चाललं होतं.”
कहाणीत इस्रायली पतीची एन्ट्री, कायदेशीर लढाईचे संकेत
या प्रकरणात नवा ट्विस्ट आला तो निनाच्या मुलींचे वडील आणि इस्रायली व्यावसायिक ड्रॉर गोल्डस्टेन याच्या प्रतिक्रियेमुळे. ड्रॉरने सांगितले की, “आठ वर्षांपूर्वी आमची गोव्यात भेट झाली. मी निना आणि मुलींच्या संगोपनासाठी दर महिन्याला पैसे पाठवत होतो. पण तिने मला न सांगताच मुलींना घेऊन गोकर्ण गाठले. त्या बेपत्ता असल्याची तक्रारही मी दिली होती. मला माझ्या मुलींसोबत राहायचे आहे आणि त्यांना रशियाला पाठवू नये, यासाठी मी कायदेशीर लढाई लढण्यास तयार आहे.”
अध्यात्म की शांततेचा शोध?
निना अध्यात्माच्या शोधात गुहेत राहत असल्याचा सुरुवातीला अंदाज होता. मात्र, निनाने हा दावा फेटाळून लावला आहे. तिच्या मते, “मी इथे शहराच्या गोंगाटापासून दूर शांततेसाठी आले होते. मला निसर्गात राहायला आवडते. मी आतापर्यंत २० देशांतील गुहांमध्ये राहिले आहे.” तिला आणि तिच्या मुलींना गुहेतून बाहेर काढल्याबद्दल तिने तीव्र नाराजी व्यक्त केली. तिने एका सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले, “वाईटाचा पुन्हा विजय झाला आहे.”
सध्या निना आणि तिच्या मुलींना डिटेन्शन सेंटरमध्ये ठेवण्यात आले असून, तिला रशियाला परत पाठवण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेला महिनाभराचा कालावधी लागण्याची शक्यता असून, तिकिटांचा खर्च निनाला स्वतः करावा लागणार आहे. या गूढ प्रकरणात अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाली असली तरी, अनेक धागेदोरे अद्यापही गुंतलेले आहेत, ज्यांचा पोलीस तपास करत आहेत.