News Of Maharashtra

नेपाळ दरबार हत्याकांड: राजा वीरेंद्र यांचे ते शेवटचे शब्द, ‘के गरेको?’

नेपाळ : “के गरेको?” — या नेपाळी शब्दांचा अर्थ आहे, “हे काय केलंस?”. हे शब्द नेपाळच्या लोकांसाठी फक्त एक वाक्य नाही, तर त्यांच्या लाडक्या राजाचे, राजा वीरेंद्र यांचे अखेरचे उद्गार आहेत. आज इतक्या वर्षांनंतरही राजा वीरेंद्र यांच्या त्या शेवटच्या शब्दांची आठवण होण्याचं कारण म्हणजे नेपाळमधील राजकीय अस्थिरता. पण या सगळ्या चर्चांमध्ये एक गोष्ट कायम बोलली जाते, जर ‘के गरेको?’ हे राजा वीरेंद्र यांचे शेवटचे शब्द नसते, तर आज नेपाळचे चित्र वेगळे असते.

नेपाळच्या भविष्याला कलाटणी देणारी ती रात्र होती १ जून २००१. त्या रात्री केवळ नेपाळचे राजघराणे संपले नाही, तर राजेशाहीच्या अस्ताची सुरुवात झाली. ज्या रस्त्यांवरून शाही परिवाराच्या मिरवणुका निघायच्या, त्याच रस्त्यांवरून नऊ मृतदेहांची अंत्ययात्रा निघाली. काही दिवसांनी आणखी एक अंत्ययात्रा निघाली, ती म्हणजे युवराज दीपेंद्र यांची, ज्यांना या नऊ मृत्यूंसाठी जबाबदार धरण्यात आले होते.


 

ती काळरात्र: १ जून २००१

 

राजा वीरेंद्र यांनी १९७२ साली नेपाळची गादी सांभाळली आणि अल्पावधीतच प्रचंड लोकप्रियता मिळवली. त्यांनी नेपाळमध्ये राजेशाहीसोबत लोकशाहीला महत्त्व दिले. लोकांचे म्हणणे ऐकून घेणारा राजा म्हणून ते ओळखले जायचे. त्यांनी दर नेपाळी महिन्याच्या तिसऱ्या शुक्रवारी शाही पार्टीची प्रथा सुरू केली होती. १ जून २००१ रोजी होणाऱ्या पार्टीच्या आयोजनाची जबाबदारी युवराज दीपेंद्र यांच्यावर होती.

ही पार्टी नारायण हिटी पॅलेसच्या त्रिभुवन सदनमध्ये होणार होती, जिथे शाही बॉडीगार्ड्सनाही प्रवेश नसायचा. संध्याकाळ होताच पाहुणे जमू लागले. युवराज दीपेंद्र यांनी स्वतः पाहुण्यांचे स्वागत केले आणि मद्यपान सुरू केले. हळूहळू पार्टी रंगात येत होती.

काही वेळाने युवराज दीपेंद्र इतके नशेत होते की, त्यांचा भाऊ राजकुमार निराजन आणि इतरांनी त्यांना उचलून त्यांच्या बेडरूममध्ये नेले. त्यानंतर राजा वीरेंद्र यांचे पार्टीत आगमन झाले आणि गप्पांना उधाण आले.


 

नेपाळ दरबार हत्याकांड (Nepal Darbar Hatyakand)

राजा वीरेंद्र (Raja Birendra)

युवराज दीपेंद्र (Yuvraj Dipendra)

Nepal Royal Massacre

 

सात मिनिटांचा थरार

 

रात्री साधारण ८ वाजून ५० मिनिटांनी बिलियर्ड्स रूमचा दरवाजा उघडला आणि समोर एक तरुण लष्करी गणवेशात उभा होता. त्याच्या एका हातात अमेरिकन कोल्ट एम-१६ रायफल, दुसऱ्या हातात जर्मन एमपी-५ सबमशीन गन आणि कमरेला ९ एमएम पिस्तूल होती. तो दुसरा तिसरा कोणी नसून युवराज दीपेंद्र होते.

सुरुवातीला त्यांनी हवेत गोळीबार केला, पण पुढच्याच क्षणी त्यांनी वडील राजा वीरेंद्र यांच्यावर गोळ्या झाडल्या. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या राजा वीरेंद्र यांनी दीपेंद्र यांच्याकडे पाहिले आणि उद्गारले, “के गरेको?” (हे काय केलंस?).

यानंतर दीपेंद्र यांनी शांतपणे बिलियर्ड्स रूममध्ये अक्षरशः रक्ताचा सडा पाडला. त्यांनी आपले काका धीरेंद्र, बहीण श्रुती, भाऊ निराजन, आत्या शांती आणि शारदा यांच्यासह समोर दिसेल त्यावर अंदाधुंद गोळीबार केला. जो कोणी त्यांना थांबवायला पुढे आला, तो त्यांच्या गोळीचा शिकार झाला.

हा नरसंहार पाहून महाराणी ऐश्वर्या जीव वाचवण्यासाठी बाहेर पळाल्या, पण दीपेंद्र यांनी त्यांच्यावरही पाठीमागून गोळी झाडली. अवघ्या ५-६ मिनिटांत त्यांनी सहा जणांचा बळी घेतला होता. यानंतर त्रिभुवन सदनमधील एका तलावाजवळ जाऊन दीपेंद्र यांनी स्वतःवर गोळी झाडली. सात मिनिटांचा हा थरार आता संपला होता.


 

हत्याकांडानंतर…

 

थोड्याच वेळात जखमींना आर्मी हॉस्पिटलमध्ये नेण्याची धावपळ सुरू झाली. राजा वीरेंद्र यांचा श्वास सुरू असल्याने त्यांना वाचवण्याला प्राधान्य देण्यात आले, पण रात्री ९ वाजून १५ मिनिटांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले. एकामागून एक मृत्यूच्या बातम्या येत होत्या. राजा वीरेंद्र यांचे संपूर्ण कुटुंब संपले होते, अपवाद फक्त कोमात गेलेल्या युवराज दीपेंद्र यांचा.

राजा वीरेंद्र यांचे भाऊ ज्ञानेंद्र हे कामानिमित्त बाहेर असल्याने पार्टीत उपस्थित नव्हते. त्यांनी हॉस्पिटलमध्ये पोहोचून कोमात असलेल्या युवराज दीपेंद्र यांनाच नेपाळचे पुढचे महाराज म्हणून घोषित केले. ४ जून २००१ रोजी उपचारादरम्यान युवराज दीपेंद्र यांचाही मृत्यू झाला आणि त्यानंतर राजा ज्ञानेंद्र यांनी स्वतःला महाराज घोषित केले. अवघ्या चार दिवसांत नेपाळने तिसरा राजा पाहिला.


 

तपास आणि अनुत्तरित प्रश्न

 

या हत्याकांडामागे नक्की काय कारण होते, याचा तपास करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली. तपासात अनेक थिअरीज समोर आल्या:

  1. प्रेमास विरोध: युवराज दीपेंद्र यांचे देवयानी राणा यांच्यावर प्रेम होते आणि त्यांना तिच्याशी लग्न करायचे होते. पण राणा घराणे आणि शाह घराण्याचे जुने वैर असल्याने महाराणी ऐश्वर्या यांचा या लग्नाला तीव्र विरोध होता. याच रागातून दीपेंद्र यांनी हे कृत्य केल्याचे सांगितले जाते.
  2. सत्तेची लालसा: दीपेंद्र यांना लवकरात लवकर महाराज व्हायचे होते, म्हणून त्यांनी संपूर्ण कुटुंबाला संपवले.
  3. राजा ज्ञानेंद्र यांचा कट: ज्ञानेंद्र पार्टीत अनुपस्थित होते, त्यांच्या मुलाला गोळी लागली नाही आणि त्यांच्या पत्नी गोळी लागूनही बचावल्या. त्यामुळे सत्ता मिळवण्यासाठी त्यांनीच हा कट रचल्याचा आरोप झाला.

मात्र, यापैकी कोणतीच थिअरी ठोसपणे सिद्ध झाली नाही. नेपाळच्या लोकांच्या मनात आजही अनेक प्रश्न आहेत:

  • स्कॉटलंड यार्डसारखी निष्णात तपास यंत्रणा असताना तपास फक्त आठवडाभर का चालला?
  • युवराज दीपेंद्र यांचे पोस्टमॉर्टम का झाले नाही?
  • दीपेंद्र उजव्या हाताने काम करत, मग त्यांनी स्वतःवर डाव्या हाताने गोळी का झाडली?

या प्रश्नांची उत्तरे कधीच मिळाली नाहीत. पण त्या सात मिनिटांच्या थराराने नेपाळचे राजघराणे संपवले आणि देशाचा इतिहास कायमचा बदलून टाकला. आजही नारायण हिटी पॅलेस जवळून जाताना नेपाळी जनतेला आपल्या लाडक्या राजाची आणि त्यांच्या शेवटच्या शब्दांची आठवण येते – “के गरेको?”

Exit mobile version