News Of Maharashtra

मुंबईत मराठा आंदोलकांचे हाल: पाणी, अन्न, निवाऱ्यासाठी संघर्ष; सरकारवर जाणीवपूर्वक कोंडी केल्याचा आरोप

मुंबई: मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील आझाद मैदानावर सुरू झालेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला पहिल्याच दिवसापासून तीव्र संघर्षाला सामोरे जावे लागत आहे. आंदोलकांसाठी पाणी, अन्न, निवारा आणि स्वच्छतेच्या मूलभूत सुविधांची प्रचंड गैरसोय झाली असून, राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिका जाणीवपूर्वक आंदोलकांची कोंडी करत असल्याचा गंभीर आरोप आंदोलकांकडून केला जात आहे.


 

पाणी, चिखल आणि निवाऱ्यासाठी संघर्ष

 

शुक्रवारपासून मुंबईत कोसळणाऱ्या पावसामुळे आझाद मैदान अक्षरशः चिखलाने भरले असून, तिथे अक्षरशः तळे साचले आहे. यामुळे आंदोलकांना रात्रभर ओल्या कपड्यांनी आणि पावसात भिगून काढावी लागली. अनेकांनी जवळच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर आसरा घेतला.

सकाळी नैसर्गिक विधीसाठी गेलेल्या आंदोलकांना एकतर शौचालयांना कुलूप दिसले किंवा पाणीच नसल्याचा अनुभव आला. एका आंदोलकाने दिलेल्या माहितीनुसार, पाणी नसल्याने एका मराठा बांधवाने ट्रकभर बिसलेरीच्या बाटल्या आणल्या आणि त्यानंतर आंदोलक नैसर्गिक विधीसाठी जाऊ शकले. “आम्ही समुद्रात राहतोय असं वाटतंय. महानगरपालिकेने साधं पिण्याचं पाणीही उपलब्ध करून दिलेलं नाही,” अशी संतप्त प्रतिक्रिया एका आंदोलकाने दिली.


 

Maratha Reservation

मराठा आरक्षण

Manoj Jarange Patil

मनोज जरांगे पाटील

Maratha Protest

 

अन्नासाठी वणवण: बंद हॉटेल्स आणि खाऊ गल्ल्या

 

आंदोलकांच्या जेवणाची सोय व्हावी यासाठी जवळच्या खाऊ गल्ल्या, हॉटेल्स आणि अगदी वडापावच्या गाड्याही बंद ठेवण्यात आल्याने आंदोलकांचे प्रचंड हाल झाले. “आम्ही आमच्या पैशांनी जेवतोय, तरीही हॉटेल्स बंद करायला लावली. आम्ही खायचं काय?” असा सवाल आंदोलकांनी उपस्थित केला.

अनेक आंदोलकांनी आपल्यासोबत आणलेला शिधा वापरून टेम्पो आणि ट्रकमध्ये स्वयंपाक केला, मात्र तो अपुरा पडला. यामुळे अनेकांना उपाशीपोटी किंवा केवळ वडापाव खाऊन रात्र काढावी लागली.

 

‘लालबागचा राजा’ अन्नछत्राचा वाद

 

लालबागचा राजा मंडळाने मराठा आंदोलकांसाठी सुरू केलेले अन्नछत्र बंद ठेवल्याच्या पोस्ट्स सोशल मीडियावर व्हायरल झाल्या. मात्र, मंडळाने ज्या जागेत अन्नछत्र उभारले होते, त्या जागेच्या मालकाला महानगरपालिकेने नोटीस पाठवून मंडप हटवण्याचे निर्देश दिल्याने ते सुरू होण्याआधीच बंद करावे लागले.


 

आंदोलकांचा आक्रमक पवित्रा आणि जरांगे पाटलांचा इशारा

 

सुविधांच्या अभावामुळे संतप्त झालेल्या मराठा बांधवांनी शनिवारी सकाळी CSMT परिसरात आक्रमक पवित्रा घेतला. काहींनी रस्त्यावरच चूल मांडून पोहे बनवायला सुरुवात केली, तर काहींनी अर्ध नग्न आणि मुंडण करून सरकारचा निषेध केला. यामुळे परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली.

यावर मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलकांना शांततेचे आवाहन करत म्हटले, “पोलिसांना सहकार्य करा, रस्ते अडवू नका.” मात्र, त्याचवेळी त्यांनी सरकार आणि प्रशासनालाही खडे बोल सुनावले. “तुम्ही आमचं पाणी बंद केलं, याचा हिशोब होणार. काय भिकारचाळे आहेत तुमचे? ५०-६० वर्षे सत्ता भोगली आणि आझाद मैदानात साध्या लाईट्स नाहीत. तुम्ही जेवढा विलंब कराल, तेवढे मराठे मुंबईत वाढतील,” असा थेट इशारा त्यांनी दिला.


 

प्रशासकीय हालचाली आणि पुढील दिशा

 

आंदोलकांचा आक्रमक पवित्रा पाहता, मुंबई महापालिकेसमोर रॅपिड ॲक्शन फोर्स (RAF) आणि दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आले आहे. जरांगे पाटलांच्या आवाहनानंतर आंदोलकांनी रस्ता मोकळा करण्यास सुरुवात केली असली, तरी मूलभूत सुविधांच्या अभावामुळे त्यांचे हाल सुरूच आहेत. कितीही त्रास झाला तरी आरक्षणाशिवाय मागे हटणार नाही, अशी ठाम भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. त्यामुळे आता प्रशासन आंदोलकांची गैरसोय टाळण्यासाठी काय पावले उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version