रत्नागिरी: घरातून मैत्रिणीकडे जाते सांगून निघालेल्या २६ वर्षीय तरुणीच्या हत्येचा तपास करत असताना रत्नागिरी पोलिसांना एका सिरीयल किलरच्या मुसक्या आवळण्यात यश आले आहे. गर्भवती प्रेयसीचा खून करणाऱ्या या नराधमाने यापूर्वीही संशयातून दोघांची हत्या केल्याचे उघड झाले असून, या तिहेरी हत्याकांडामुळे संपूर्ण कोकणात खळबळ उडाली आहे. आरोपीच्या एका व्हॉट्सॲप स्टेटसमुळे या संपूर्ण प्रकरणाचा छडा लागला.
रत्नागिरी तिहेरी हत्याकांड व्हॉट्सॲप स्टेटसने वाढवला संशय
रत्नागिरीच्या मिरजोळे गावात राहणारी भक्ती मायकर (वय २६) ही १६ ऑगस्ट रोजी घरातून मैत्रिणीकडे राहण्यासाठी जाते, असे सांगून बाहेर पडली. दोन-तीन दिवस उलटूनही ती परत न आल्याने आणि तिचा फोन बंद असल्याने तिच्या भावाने शोधाशोध सुरू केली. भक्तीचे खंडाळा येथील बिअर शॉपीचा मालक दुर्वास पाटील याच्यासोबत प्रेमसंबंध असल्याची कल्पना घरच्यांना होती. त्यामुळे ती त्याच्यासोबत पळून गेल्याचा प्राथमिक अंदाज होता. मात्र, भक्तीच्या भावाने दुर्वासचे व्हॉट्सॲप स्टेटस पाहिले असता, त्याने दुसऱ्याच मुलीसोबत टिळा लावल्याचे फोटो ठेवले होते. यामुळे भावाचा संशय बळावला आणि त्याने २१ ऑगस्ट रोजी रत्नागिरी शहर पोलिसांत भक्ती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली.

असा लागला खुनाचा छडा
पोलिसांनी मुख्य संशयित म्हणून दुर्वास पाटीलला चौकशीसाठी बोलावले, मात्र त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपासावर भर दिला. भक्तीच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन आणि दुर्वासचे लोकेशन एकाच ठिकाणी असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी खाक्या दाखवताच दुर्वास पोपटासारखा बोलू लागला आणि त्याने भक्तीच्या हत्येची कबुली दिली.
भक्ती गर्भवती असल्याने ती लग्नासाठी तगादा लावत होती. मात्र, दुर्वासला तिच्याशी लग्न करायचे नव्हते आणि त्याच्या घरच्यांनी त्याचे लग्न दुसरीकडे ठरवले होते. त्यामुळे लग्नाच्या बहाण्याने १६ ऑगस्टला त्याने भक्तीला आपल्या बिअर शॉपीवर बोलावले आणि वायरने गळा आवळून तिची निर्घृण हत्या केली. त्यानंतर विश्वास पवार आणि सुशांत नरळकर या साथीदारांच्या मदतीने तिचा मृतदेह प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळून आंबोली घाटात फेकून दिला. तब्बल १४ दिवसांनंतर, ३० ऑगस्ट रोजी पोलिसांनी ट्रेकर्सच्या मदतीने भक्तीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह घाटातून बाहेर काढला. तिच्या हातावरील टॅटूमुळे मृतदेहाची ओळख पटली.
आणखी दोन खुनांची कबुली
एका गर्भवतीचा थंड डोक्याने खून करणाऱ्या दुर्वासचा क्रूरपणा पाहून पोलिसांना तो सराईत गुन्हेगार असल्याचा संशय आला. अधिक चौकशी केली असता, त्याने यापूर्वीही दोन खून केल्याचे कबूल केले:
- सिताराम वीर (वय ५५): दुर्वासच्या बिअर शॉपीमध्ये काम करणाऱ्या सिताराम यांच्यावर त्याला संशय होता. भक्ती कधीतरी दुर्वासबद्दल विचारण्यासाठी सिताराम यांना फोन करायची. याच संशयातून दुर्वासने २९ एप्रिल २०२४ रोजी राकेश जंगम आणि विश्वास पवारच्या मदतीने सिताराम यांना बेदम मारहाण करून घरी सोडून दिले. दारू पिऊन पडल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा बनाव रचण्यात आला, मात्र मारहाणीमुळेच त्यांचा मृत्यू झाला होता.
- राकेश जंगम: सिताराम यांच्या हत्येतील साथीदार असलेल्या राकेश जंगम याने या घटनेची माहिती आपल्या आईला दिली होती. ही गोष्ट बाहेर फुटेल या भीतीने दुर्वासने राकेशला संपवण्याचा कट रचला. ६ जून २०२४ रोजी कोल्हापूरला कामासाठी जायचे सांगून त्याने राकेशला गाडीत बसवले आणि विश्वास पवार व निलेश भिंगारडे यांच्या मदतीने त्याला ठार मारून त्याचा मृतदेहही आंबोली घाटात फेकून दिला.
एकापाठोपाठ एक खून पचवल्याने दुर्वास निर्ढावला होता. मात्र, भक्तीच्या भावाच्या सतर्कतेमुळे आणि पोलिसांच्या तांत्रिक तपासामुळे त्याचे बिंग फुटले आणि एकाच वेळी तीन खुनांचा उलगडा झाला. राकेश जंगमच्या बेपत्ता होण्याची तक्रार पोलिसांनी गांभीर्याने घेतली असती, तर आज भक्ती आणि तिच्या बाळाचा जीव वाचला असता, अशी संतप्त चर्चा मिरजोळे गावात सुरू आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.