मुंबई: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आझाद मैदानावर उपोषणाला बसलेले मनोज जरांगे-पाटील यांची भेट घेण्यासाठी गेलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांना रविवारी तीव्र विरोधाचा सामना करावा लागला. संतप्त मराठा आंदोलकांनी “शरद पवारांनी मराठ्यांचं वाटोळं केलं” अशा घोषणा देत सुळे यांच्या गाडीवर पाण्याच्या बाटल्या फेकल्या. या घटनेमुळे आझाद मैदान परिसरात काही काळ तणावाचे आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
नेमकं काय घडलं?
रविवारी, ३१ ऑगस्ट रोजी दुपारी सव्वातीनच्या सुमारास खासदार सुप्रिया सुळे या मनोज जरांगे-पाटील यांची भेट घेण्यासाठी आझाद मैदानावरील आंदोलनस्थळी पोहोचल्या. यावेळी जरांगे-पाटील विश्रांती घेत असल्याने सुळे यांना काही वेळ थांबावे लागले. जरांगे-पाटील उठल्यानंतर दोघांमध्ये काही काळ चर्चा झाली.
या भेटीनंतर सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. “मनोज जरांगे-पाटील यांची प्रकृती खालावली आहे, त्यांना अशक्तपणा आला आहे. सरकारने आंदोलनकर्त्यांची गैरसोय टाळावी. माझी मुख्यमंत्र्यांना हात जोडून विनंती आहे की, त्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावून अधिवेशन घ्यावे आणि मराठा आरक्षणाचा निर्णय घ्यावा. आरक्षणाचा निर्णय घेण्याचा अधिकार सत्ताधाऱ्यांच्या हातात आहे,” अशी भूमिका त्यांनी मांडली.
मात्र, सुळे आपल्या गाडीच्या दिशेने निघाल्या असता, मराठा आंदोलकांनी त्यांना घेराव घातला. ‘एक मराठा, लाख मराठा’ या घोषणांनी परिसर दणाणून गेला. सुरक्षा रक्षकांच्या मदतीने सुळे गाडीपर्यंत पोहोचल्या, तेव्हा काही संतप्त आंदोलकांनी त्यांच्या गाडीच्या दिशेने पाण्याच्या बाटल्या फेकल्या आणि शरद पवारांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या तीव्र विरोधामुळे अखेर सुळे यांना तेथून निघावे लागले.

शरद पवार विरोधामागे ‘मंडल यात्रे’ची पार्श्वभूमी?
या विरोधामागे शरद पवार गटाने सुरू केलेली ‘मंडल यात्रा’ हे एक प्रमुख कारण मानले जात आहे. राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असताना, राष्ट्रवादीने ओबीसी आरक्षणाचे समर्थन करणारी ‘मंडल यात्रा’ सुरू केली होती. शरद पवारांनी मंडल आयोगाची अंमलबजावणी करून ओबीसींना आरक्षण मिळवून दिले, हा यात्रेचा मुख्य प्रचार होता. मात्र, यामुळे मराठा समाजात तीव्र नाराजी पसरली होती. अखेर, जरांगे-पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी शनिवारी, ३० ऑगस्ट रोजी ही यात्रा स्थगित करण्यात आली.
पवारांकडून ‘डॅमेज कंट्रोल’चा प्रयत्न फसला?
मंडल यात्रेमुळे मराठा समाजात निर्माण झालेली नाराजी दूर करण्यासाठी शरद पवार गटाकडून ‘डॅमेज कंट्रोल’चे प्रयत्न सुरू झाल्याचे चित्र होते. राष्ट्रवादीच्या ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे (राजापूरकर) यांनी शनिवारी जरांगे-पाटील यांची भेट घेतली. त्यापाठोपाठ राजेश टोपे, बजरंग सोनवणे, निलेश लंके यांच्यासह पक्षाच्या अनेक नेत्यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला होता. सुप्रिया सुळे यांची भेट हा याच प्रयत्नांचा एक भाग मानला जात होता.
मात्र, आझाद मैदानावर सुप्रिया सुळे यांना ज्या रोषाचा सामना करावा लागला, ते पाहता पवारांचा हा ‘डॅमेज कंट्रोल’चा प्रयत्न फसला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
सत्ताधाऱ्यांकडूनही पवारांवर टीका
दुसरीकडे, सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनीही मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून शरद पवारांना लक्ष्य केले आहे. “शरद पवार चार वेळा मुख्यमंत्री आणि दहा वर्षे केंद्रात मंत्री होते, तेव्हा त्यांना मराठा आरक्षणासाठी घटनादुरुस्ती का सुचली नाही?” असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, चंद्रकांत पाटील आणि उदय सामंत यांनी केला आहे. पवारांनी सत्तेत असताना मराठा समाजासाठी काहीच केले नाही, असे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे.
या सर्व घडामोडींमुळे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. सुप्रिया सुळे यांच्यासोबत झालेल्या प्रकारानंतर आता शरद पवार स्वतः मनोज जरांगे-पाटील यांची भेट घेणार का आणि या राजकीय नुकसानीची भरपाई कशी करणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.