मुंबई: अनंत चतुर्दशीला मुंबईच्या राजासह राज्यभरातील गणेश मूर्तींचे विसर्जन उत्साहात पार पडले, मात्र मुंबईचा मानबिंदू असलेल्या ‘लालबागच्या राजा’च्या विसर्जनाला अभूतपूर्व विलंब झाल्याने भाविकांची चिंता वाढली आहे. तब्बल २२ तासांची भव्य मिरवणूक काढून रविवारी सकाळी गिरगाव चौपाटीवर दाखल झालेल्या राजाच्या मूर्तीला समुद्रातील भरतीचा मोठा अडथळा निर्माण झाला. यामुळे दुपारपर्यंत राजाची मूर्ती कमरेइतक्या पाण्यातच होती. या विलंबासाठी मंडळाने आणलेला गुजरातनिर्मित अत्याधुनिक तराफा आणि समुद्राच्या वेळेचे चुकलेले गणित कारणीभूत असल्याचा आरोप स्थानिक कोळी बांधवांनी केल्याने एका नव्या वादाला तोंड फुटले .
लालबागचा राजा विसर्जन दरम्यान गिरगाव चौपाटीवर नेमके काय घडले?
शनिवारी सकाळी १० वाजता लालबागच्या मंडपातून निघालेली राजाची विसर्जन मिरवणूक रविवारी सकाळी ८ च्या सुमारास गिरगाव चौपाटीवर पोहोचली. दरवर्षीप्रमाणे आरती झाल्यानंतर काही वेळातच विसर्जन होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, समुद्राला मोठी भरती आल्याने परिस्थिती पूर्णपणे बदलली.
राजाच्या विसर्जनासाठी यंदा गुजरातहून एक मोठा आणि अत्याधुनिक, स्वयंचलित तराफा आणण्यात आला होता. सकाळी ९ वाजता मूर्ती या तराफ्यावर चढवण्याचे प्रयत्न सुरू झाले. पण समुद्राच्या पाण्याची पातळी वाढल्याने तराफा वर उचलला गेला आणि अस्थिर झाला. त्यामुळे मूर्ती तराफ्यावर चढवणे अत्यंत जोखमीचे बनले. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मूर्तीसह ट्रॉली समुद्रात थोडी आत नेली, मात्र सात ते आठ तास उलटूनही मूर्ती तराफ्यावर चढवण्यात यश आले नाही. यामुळे राजाची मूर्ती कमरेपर्यंत पाण्यातच होती.

विलंबामागे तांत्रिक अडचणी आणि मानवी चुका?
माध्यमांच्या वृत्तानुसार, अनेक तास मूर्ती पाण्यात राहिल्यामुळे मूर्तीचा मागील भाग जड झाला होता, ज्यामुळे हायड्रॉलिक सिस्टीमने मूर्ती उचलण्यात अडचणी येत होत्या. समुद्राला आलेल्या प्रचंड भरतीमुळे अत्याधुनिक तराफादेखील हलू लागल्याने धोका वाढला होता. अखेर गणेश गल्लीच्या ‘मुंबईचा राजा’ मंडळाचे कार्यकर्ते आणि स्थानिक कोळी बांधव मदतीसाठी धावून आले. जुन्या तराफ्याची मदत घेण्याचे प्रयत्नही सुरू होते.
मंडळाच्या सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मूर्ती चौपाटीवर पोहोचण्यास थोडा उशीर झाला आणि तोपर्यंत समुद्राच्या पाण्याची पातळी वाढली होती. त्यामुळे तराफा आणि मूर्ती यांची पातळी जुळू शकली नाही, ज्यामुळे हा विलंब झाला.
कोळी बांधवांचा गंभीर आरोप; नवा वाद पेटला
वर्षानुवर्षे लालबागच्या राजाचे विसर्जन करणारे गिरगाव चौपाटीचे नाखवा हिरालाल वाडकर यांनी मंडळावर गंभीर आरोप केले आहेत. “मंडळाला समुद्राच्या भरती-ओहोटीच्या वेळेचा अंदाज आला नाही. आम्ही अनेक वर्षे राजाचे विसर्जन करत आलो आहोत, पण यंदा गुजरातच्या तराफ्याला कंत्राट देण्यात आले. त्यांनी विसर्जनाकडे काळजीपूर्वक लक्ष द्यायला हवे होते,” असे वाडकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. पारंपरिक बोटींऐवजी अत्याधुनिक तराफ्याचा अट्टहास आणि नियोजनातील त्रुटींमुळेच हा विलंब झाल्याचा सूर कोळी बांधवांमध्ये आहे.
सध्या गिरगाव चौपाटीवर हजारो भाविक डोळ्यात प्राण आणून राजाच्या विसर्जनाची वाट पाहत आहेत. “बाप्पा, आमच्याकडून काही चूक झाली असेल तर क्षमा कर,” असे साकडे कार्यकर्ते आणि भाविकांकडून घातले जात आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान असतानाही राजाच्या विसर्जनाला लागलेल्या या विलंबामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले असून, या घटनेची सर्वत्र चर्चा सुरू आहे.
