संगमनेर/जालना: संगमनेर तालुक्यातील घारगाव नजीकच्या मुळा नदीपात्रात दोन ते तीन महिन्यांच्या एका बाळाचा मृतदेह आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली होती. ही घटना गुरुवारी, ४ डिसेंबर रोजी सकाळी उघडकीस आली. या घटनेचा तपास करत असताना पोलिसांनी अत्यंत धक्कादायक खुलासा केला आहे. जन्मजात अपंग असलेल्या आपल्या तीन महिन्यांच्या शिवांश नावाच्या बाळाची निर्घृण हत्या करून त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावल्याप्रकरणी पोलिसांनी बाळाच्या जन्मदात्या आई-वडिलांना आणि त्यांना मदत करणाऱ्या एका मित्राला अटक केली आहे.
काय घडले नेमके?
संगमनेर तालुक्यातील आंबेल खालसा गावात राहणारे अशोक माळी यांना गुरुवारी (दि. ४ डिसेंबर) सकाळी काही कामासाठी घराबाहेर पडले असताना मुळा नदीपात्राजवळील झुडपात काहीतरी संशयास्पद दिसले. जवळ जाऊन पाहिले असता त्यांना साधारण दोन ते तीन महिन्यांच्या एका बाळाचा मृतदेह दिसला. त्यांनी तात्काळ आजूबाजूच्या नागरिकांना बोलावले आणि घटनेची माहिती घारगाव पोलिसांना देण्यात आली.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व मृतदेह ताब्यात घेऊन पुढील कार्यवाहीसाठी पाठवून दिला. बाळाची ओळख पटवणे आणि मृत्यूचे गूढ उकलणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते.

सीसीटीव्ही ठरले महत्त्वाचा दुवा
पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी सुरू केली. घटनास्थळापासून रस्त्याच्या पलीकडील एका उंच घरावर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजमध्ये रात्रीच्या वेळी एका पांढऱ्या रंगाची फोर-व्हीलर गाडी त्या ठिकाणी येऊन थांबल्याचे दिसून आले.
या गाडीच्या नंबरवरून पोलिसांनी तपास केला असता, ती गाडी जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील आव्हाना येथील हरिदास गणेश राठोड यांच्या मालकीची असल्याचे समोर आले. हाच धागा पकडून पोलिसांचे एक पथक तात्काळ जालन्यात दाखल झाले.
आई-वडिलांकडून हत्येची कबुली
पोलिसांनी भोकरदन परिसरात चौकशी सुरू केली. प्राथमिक आरोग्य केंद्रांमधून मागील दोन-तीन महिन्यांत जन्मलेल्या बाळांची माहिती गोळा केली असता, त्यांना कविता जाधव या आईचे नाव समोर आले. पोलिसांनी कविता जाधव आणि पती प्रकाश जाधव यांच्या घरी जाऊन विचारपूस केली. त्यांनी सुरुवातीला ‘बाळ आजारी असून संभाजीनगर (औरंगाबाद) येथील हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे,’ असे सांगून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.
मात्र, पोलिसांना संशय आल्याने त्यांना सखोल चौकशीसाठी अहिल्यानगरच्या (अहमदनगर) गुन्हे शाखा कार्यालयात बोलावण्यात आले. कसून चौकशी केली असता, कविता आणि प्रकाश जाधव या दांपत्याने आपल्याच तीन महिन्यांच्या मुलाचा खून केल्याची कबुली दिली.
जन्मजात अपंगत्व ठरले कारण
पोलिसांच्या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, प्रकाश आणि कविता जाधव हे मूळचे जालन्यातील भोकरदन तालुक्यातील आहेत. त्यांना आधी एक १७ वर्षांचा मुलगा आहे. मात्र, तीन महिन्यांपूर्वी जन्मलेला त्यांचा दुसरा मुलगा शिवांश याला जन्मजात मणक्याचा आजार असल्याने तो कान आणि हाताने अपंग होता. डॉक्टरांनी हे अपंगत्व कधीही बरे होणार नाही, असे सांगितले होते.
या अपंगत्वामुळे आणि मुलाच्या उपचारावर मोठ्या प्रमाणात खर्च येणार असल्याने, तो बरा होणार नाही या चिंतेतून या दांपत्याने आपल्या पोटच्या लेकाला कायमचे संपवण्याचा निर्णय घेतला.
🛣️ प्रवास आणि हत्या
-
बुधवारी (दि. ३ डिसेंबर) रोजी जाधव दांपत्य आणि त्यांचा मित्र हरिदास राठोड हे हरिदासच्या आर्टिगा गाडीतून (एमएच ०२ एच ५३५४) जालन्याहून संभाजीनगरला गेले.
-
तेथे डॉक्टरांना भेटल्यानंतर उपचारावर खूप खर्च येईल, पण तो पूर्ण बरा होणार नाही, हे कळल्यावर त्यांनी पुण्याच्या दिशेने प्रवास सुरू केला.
-
या प्रवासातच त्यांनी संगमनेर तालुक्यातील घारगावजवळ मुळा नदीवरील पुलाजवळ आपल्या बाळाची हत्या करण्याचा कट रचला.
-
पोलिसांच्या माहितीनुसार, पुलाजवळ आल्यावर प्रकाश जाधव याने तीन महिन्यांच्या चिमुकल्या शिवांशचा गळा दाबून खून केला.
-
पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्यांनी मुलाच्या अंगावरचे कपडे काढले आणि मृतदेह पुलावरून खाली नदीत फेकून दिला.
बाळाची हत्या केल्यानंतर हे दांपत्य आणि त्यांचा मित्र लगेच देवदर्शनासाठी आळंदी येथे गेले, त्यानंतर प्रकाश आणि हरिदास भोकरदनला परतले. बाळाच्या आजारपणाचे नाटक करत, तो संभाजीनगरला ॲडमिट असल्याचे त्यांनी नातेवाईकांना सांगितले. मात्र, सीसीटीव्ही फुटेजमुळे त्यांचे बिंग फुटले.
पोलिसांनी आरोपी कविता जाधव, प्रकाश जाधव आणि त्यांना मदत करणारा मित्र हरिदास राठोड या तिघांनाही अटक केली आहे. तसेच, त्यांची आर्टिगा गाडीही जप्त करण्यात आली आहे. आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३, २३८ (तत्सम जुन्या कायद्यातील कलम ३०२/२०१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
