Washington DC / वॉशिंग्टन, डी.सी. – अमेरिकेच्या राजकारणात ४ जुलै २०२५ हा दिवस एका ऐतिहासिक घटनेचा साक्षीदार ठरला आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिष्ठेचे केलेले आणि उद्योजक एलन मस्क यांनी तीव्र विरोध दर्शवलेले ‘द बिग ब्युटीफुल बिल’ अखेर सिनेटमध्ये एका मताच्या फरकाने मंजूर झाले आहे. या विधेयकावर ट्रम्प यांनी स्वाक्षरी करताच अमेरिकेची अर्थव्यवस्था, सामाजिक धोरणे आणि आंतरराष्ट्रीय नीती एका नव्या आणि वादग्रस्त दिशेने वाटचाल करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

 

 

‘द बिग ब्युटीफुल बिल’ मध्ये नेमके आहे तरी काय?

 

हे विधेयक केवळ कर सवलतींपुरते मर्यादित नाही, तर ते ट्रम्प यांच्या ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ या विचारसरणीचे प्रतिबिंब आहे. यातील प्रमुख तरतुदी खालीलप्रमाणे आहेत:

  • श्रीमंत वर्गाला कर सवलत: २०१७ मध्ये लागू करण्यात आलेल्या कर सवलती कायमस्वरूपी करण्यात आल्या आहेत. यामुळे श्रीमंत आणि उच्च-मध्यमवर्गीय नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. राज्य आणि स्थानिक कर वजावटीची मर्यादा देखील पुढील पाच वर्षांसाठी ४०,००० डॉलर्सपर्यंत वाढवण्यात आली आहे.
  • संरक्षण आणि सीमा खर्चात प्रचंड वाढ: लष्करासाठी तब्बल ९०० अब्ज डॉलर्स, तर सीमा सुरक्षा आणि ‘आयसीई’ एजंट्ससाठी १५० अब्ज डॉलर्सची तरतूद करण्यात आली आहे. ‘नॅशनल गार्डन ऑफ अमेरिकन हिरोज’सारख्या सांस्कृतिक प्रकल्पांसाठीही भरीव निधी देण्यात आला आहे.
  • सामाजिक सुरक्षा योजनांना कात्री: दुसरीकडे, ‘मेडिकेड’ (आरोग्य विमा), ‘स्नॅप’ (अन्न सहाय्यता) यांसारख्या गरीब आणि मध्यमवर्गीयांसाठी असलेल्या योजनांच्या निधीमध्ये मोठी कपात करण्यात आली आहे. यामुळे लाखो नागरिकांचे आरोग्य आणि अन्नसुरक्षेचे हक्क धोक्यात आले आहेत.
  • हरित ऊर्जेला धक्का: इलेक्ट्रिक वाहने, सौर ऊर्जा आणि बॅटरी प्रकल्पांना मिळणाऱ्या सरकारी सवलती रद्द केल्या जाणार आहेत. याचा थेट फटका एलन मस्क यांच्या ‘टेस्ला’ कंपनीला बसणार आहे, तसेच हरित ऊर्जा क्षेत्रातील नोकऱ्यांवरही गदा येण्याची शक्यता आहे.

 

Trump यांचा प्रतिष्टेचा मुद्दा

डोनाल्ड ट्रम्प यांनी या विधेयकाला ‘द वन बिग ब्युटीफुल बिल’ असे नाव देऊन ते प्रतिष्ठेचे केले होते. यामागे अनेक कारणे आहेत:

  • वारसा (Legacy) निर्माण करण्याची इच्छा: माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या ‘अफोर्डेबल केअर ऍक्ट’प्रमाणेच, ट्रम्प यांना स्वतःच्या नावे एक मोठा आणि प्रभावी कायदा नोंदवायचा होता.
  • राजकीय शोमनशिप: या कायद्याच्या मंजुरीनंतर अमेरिकेत फटाके फोडून आणि फायटर जेट्स उडवून जल्लोष साजरा करण्यात आला. यातून ट्रम्प यांची राजकीय ताकद दाखवण्याचा प्रयत्न दिसून येतो.
  • उदारमतवादी विचारसरणीला विरोध: कल्याणकारी योजनांमुळे अमेरिका मागे जात आहे, असे ट्रम्प यांचे मत आहे. त्यामुळे त्यांनी सामाजिक सुरक्षा योजनांना लक्ष्य केले.

 

 

 

 

 

Elon musk यांचा टोकाचा विरोध आणि नव्या पक्षाची घोषणा

विशेष म्हणजे, एकेकाळी ट्रम्प यांचे समर्थक मानले जाणारे एलन मस्क हे या विधेयकाचे सर्वात मोठे विरोधक म्हणून समोर आले आहेत.

  • वित्तीय आत्मघातकीपणा: मस्क यांनी या कायद्याला ‘फिस्कली रेकलेस’ (वित्तीय आत्मघात) म्हटले आहे. त्यांच्या मते, यामुळे अमेरिकेवरील कर्जाचा बोजा प्रचंड वाढेल. या विधेयकासाठी सरकार पुढील १० वर्षांत ३ ते ५ ट्रिलियन डॉलर्सचे कर्ज घेणार आहे.
  • ‘टेस्ला’ला फटका: हरित ऊर्जेवरील सवलती रद्द झाल्याने ‘टेस्ला’च्या व्यवसायावर थेट परिणाम होणार आहे.
  • नव्या राजकीय पक्षाची घोषणा: या संघर्षामुळे व्यथित झालेल्या मस्क यांनी ‘अमेरिकन पार्टी’ नावाच्या तिसऱ्या राजकीय पक्षाची घोषणा केली आहे. डेमोक्रॅट्स आणि रिपब्लिकन पक्षांना पर्याय देण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच, या विधेयकाला पाठिंबा देणाऱ्या सर्व लोकप्रतिनिधींना निवडणुकीत पराभूत करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

 

संघर्षाचे तात्काळ आणि दूरगामी परिणाम

 

थोडक्यात, या विधेयकाच्या मंजुरीमुळे ट्रम्प यांनी एक मोठा राजकीय विजय मिळवला आहे. त्यांचे सरकारवरील नियंत्रण आणि लोकप्रियता कायम असल्याचे दिसते. मात्र, दीर्घकाळात एलन मस्क एक मोठे आव्हान उभे करू शकतात. त्यांचे ट्विटर (X) वर २० कोटींहून अधिक फॉलोअर्स आहेत, ज्यात मोठ्या संख्येने तरुण मतदार आहेत.

या कायद्यामुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर कर्जाचा डोंगर उभा राहणार आहे. यामुळे भविष्यात व्याजदर आणि महागाई वाढण्याची शक्यता आहे. तसेच, डॉलरच्या मूल्यावर परिणाम होऊन जागतिक अर्थव्यवस्थेतही अस्थिरता निर्माण होऊ शकते.

सध्यातरी ट्रम्प आणि मस्क यांच्यातील हा संघर्ष अमेरिका आणि जगाच्या आर्थिक भवितव्याला कोणती दिशा देणार, हे पाहण्यासाठी किमान ५ ते १० वर्षे वाट पाहावी लागेल. एक मात्र निश्चित, या लढाईत दोघेही मागे हटायला तयार नाहीत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed