मंगळवेढ्यात ज्या पत्नीच्या खुनाच्या आरोपात पती अटकेत, ती प्रियकरासोबत जिवंत सापडली; दिरासोबत मिळून रचला मृत्यूचा बनाव

सोलापूर/प्रतिनिधी  : पत्नीच्या हत्येच्या आरोपाखाली पतीला अटक, जळालेल्या अवस्थेत सापडलेला मृतदेह आणि कौटुंबिक कलहाची चर्चा… या सर्व घटनांनी सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुका हादरला होता. मात्र, पोलिसांच्या तपासात या प्रकरणाला एक धक्कादायक आणि अत्यंत नाट्यमय वळण मिळालं आहे. ज्या पत्नीच्या (किरण) हत्येच्या आरोपाखाली पती नागेश सावंत याला अटक झाली होती, ती जिवंत असून तिने आपल्याच चुलत दिराच्या (निशांत सावंत) मदतीने स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचल्याचे उघड झाले आहे. या बनावासाठी या दोघांनी एका निरपराध महिलेची हत्या करून तिचा मृतदेह जाळल्याची क्रूर घटना समोर आली आहे.

 

 

 

काय मंगळवेढा मधील आहे संपूर्ण प्रकरण?

मंगळवेढा तालुक्यातील पाटखळ गावातील नागेश सावंत याचा विवाह तीन वर्षांपूर्वी किरण दांडगे हिच्याशी झाला होता. त्यांना एक मुलगीही आहे. सोमवारी सकाळी नागेशच्या शेतातील कडब्याच्या गंजीत एका महिलेचा पूर्णपणे जळालेला मृतदेह आढळला. किरणचे वडील दशरथ दांडगे यांनी, आपली मुलगी किरण हिचा नागेशनेच खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळल्याचा आरोप करत पोलिसांत तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी तातडीने संशयावरून पती नागेश सावंतला चौकशीसाठी ताब्यात घेतले. गावात नागेशनेच पत्नीला संपवल्याची चर्चा सुरू झाली आणि संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.

असा रचला मृत्यूचा बनाव आणि पलायनाचा कट

पोलिसांनी नागेशची चौकशी सुरू केली असता, तो सुरुवातीपासून आपण निर्दोष असल्याचे सांगत होता. दरम्यान, पोलिसांना तपासात काही महत्त्वाच्या गोष्टी खटकत होत्या. कडब्याची गंजी पेटली तेव्हा कोणीही ओरडल्याचा आवाज आजूबाजूच्या लोकांनी ऐकला नव्हता. यामुळे पोलिसांचा संशय बळावला.

तपासाअंती समोर आलेली कहाणी एखाद्या गुन्हेगारी चित्रपटाप्रमाणे होती. किरण हिचे लग्न झालेले असतानाही तिचे चुलत दीर निशांत सावंत याच्यासोबत अनैतिक संबंध होते. दोघांना एकत्र संसार थाटायचा होता, पण किरणच्या विवाहामुळे ते शक्य नव्हते. यातूनच दोघांनी किरणच्या मृत्यूचा बनाव रचण्याचा भयंकर कट रचला.

या कटाअंतर्गत, किरण आणि निशांत यांनी पंढरपूर परिसरातून एका अज्ञात, भटक्या महिलेला फूस लावून पकडले. तिची गळा दाबून हत्या केली आणि तिचा मृतदेह नागेशच्या शेतातील कडब्याच्या गंजीत टाकून पेटवून दिला. यानंतर निशांतने किरणला कराडला पळून जाण्यास मदत केली आणि स्वतः काहीही न घडल्याच्या आविर्भावात पाटखळ गावात परतला. तो नागेशच्या आणि कुटुंबाच्या दुःखात सहभागी होऊन सर्वांची दिशाभूल करत होता.

असा झाला प्रकरणाचा उलगडा

पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे आणि परिस्थितीजन्य पुराव्यांवरून किरण जिवंत असण्याची शक्यता वाटू लागली. त्यांनी तिचा शोध सुरू केला असता, ती सातारा जिल्ह्यातील कराड येथे प्रियकर निशांतसोबत सापडली. तिला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, तिने या संपूर्ण कटाची कबुली दिली.

सध्या किरण आणि तिचा प्रियकर निशांत सावंत पोलिसांच्या ताब्यात असून, त्यांच्यावर हत्या आणि पुरावा नष्ट करण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निरपराध पती नागेश सावंत याची या प्रकरणातून सुटका झाली आहे. या दोघांनी हत्या केलेली महिला नेमकी कोण होती आणि या गुन्ह्यात आणखी कोणी सामील होते का, याचा तपास पोलीस करत आहेत.

One thought on “मंगळवेढा हत्याकांडात मोठा ट्विस्ट! ज्या पत्नीच्या खुनाच्या आरोपात पती अटकेत, ती प्रियकरासोबत जिवंत सापडली; दिरासोबत मिळून रचला मृत्यूचा बनाव”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed