नवी दिल्ली: भारताचे उपराष्ट्रपती आणि राज्यसभा अध्यक्ष जगदीप धनखड यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देत त्यांनी आपला राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे सुपूर्द केला. धनखड यांनी ऑगस्ट २०२२ मध्ये भारताचे १४ वे उपराष्ट्रपती म्हणून शपथ घेतली होती. त्यांच्या या अनपेक्षित राजीनाम्यामुळे राष्ट्रीय राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

आरोग्याला प्राधान्य देत राजीनामा

आपल्या राजीनामा पत्रात धनखड यांनी प्रकृतीला प्राधान्य देणे आणि डॉक्टरांच्या सल्ल्याचे पालन करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. त्यांनी लिहिले आहे की, “माननीय राष्ट्रपती, आरोग्याला प्राधान्य देण्यासाठी आणि डॉक्टरांच्या सल्ल्याचे पालन करण्यासाठी, मी भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ६७ (अ) नुसार माझ्या पदाचा राजीनामा देत आहे.”

त्यांनी पुढे राष्ट्रपती, पंतप्रधान आणि संपूर्ण मंत्रिमंडळाचे आभार मानले. “माझा कार्यकाळ शांततेचा आणि उत्तम राहिला, यासाठी मला आपले मिळालेले अढळ समर्थन महत्त्वाचे होते. माननीय पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाप्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो. पंतप्रधानांचे सहकार्य आणि पाठिंबा अमूल्य होता आणि त्यांच्याकडून मी माझ्या कार्यकाळात खूप काही शिकलो,” असे धनखड यांनी पत्रात नमूद केले.

 

 

उपराष्ट्रपती निवडणुकीत मोठा विजय

जगदीप धनखड यांनी ६ ऑगस्ट २०२२ रोजी झालेल्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मोठा विजय मिळवला होता. त्यांना एकूण ७२५ मतांपैकी ५२८ मते मिळाली होती, तर विरोधी पक्षांच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांना १८२ मतांवर समाधान मानावे लागले होते.

धनखड यांची राजकीय आणि व्यावसायिक कारकीर्द

राजस्थानातील झुंझुनू जिल्ह्यातील एका सामान्य शेतकरी कुटुंबात १८ मे १९५१ रोजी जगदीप धनखड यांचा जन्म झाला. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण गावातच झाले आणि नंतर त्यांनी चित्तोडगड येथील सैनिक स्कूलमध्ये प्रवेश घेतला.

ते पेशाने वकील होते आणि १९९० मध्ये राजस्थान उच्च न्यायालयात वरिष्ठ वकील म्हणून नावलौकिक मिळवला. त्यांनी सर्वोच्च न्यायालयातही वकिली केली.

त्यांची राजकीय कारकीर्द १९८९ मध्ये झुंझुनू मतदारसंघातून लोकसभा खासदार म्हणून निवडून आल्यावर सुरू झाली. १९९० मध्ये ते केंद्रीय राज्यमंत्री होते. त्यानंतर १९९३ ते १९९८ पर्यंत ते राजस्थान विधानसभेत आमदार म्हणूनही कार्यरत होते. उपराष्ट्रपती होण्यापूर्वी त्यांनी पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणूनही जबाबदारी सांभाळली होती.

आपल्या कार्यकाळात धनखड अनेकदा विरोधी पक्षांच्या निशाण्यावर राहिले. संसदेच्या अधिवेशनादरम्यान, विरोधी पक्षांना बोलण्याची संधी देत नसल्याचा आणि सरकारची बाजू घेत असल्याचा आरोप त्यांच्यावर अनेकदा करण्यात आला.

सध्या धनखड यांच्या राजीनाम्यावर राष्ट्रपतींकडून अधिकृत स्वीकृतीबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही. या घडामोडींवर संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed