शिरीष गवस निधन

सिंधुदुर्ग: कोकणातील लाल माती, तेथील साधी माणसे आणि अस्सल खाद्यसंस्कृती जगासमोर आणणारा ‘रेड सॉईल स्टोरीज’ (Red Soil Stories) या प्रसिद्ध युट्यूब चॅनलचा हसरा चेहरा, शिरीष गवस , यांचे १ ऑगस्ट रोजी अकाली निधन झाले. ब्रेन ट्युमरशी झुंज देत असलेल्या शिरीशने वयाच्या अवघ्या ३५ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. कोरोना काळात नोकरी गमावल्यानंतर पत्नीसोबत सुरू केलेला त्याचा युट्यूब प्रवासाला यशाची चव चाखायला मिळत असतानाच, काळाने त्याच्यावर घाला घातला. त्याच्या अशा अचानक जाण्याने लाखो चाहत्यांवर आणि कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

 

 

शिरीष गवस यांनी नोकरी गमावली, पण जिद्दीने उभा केला ‘रेड सॉईल स्टोरीज’

एमबीए शिक्षण घेतलेला शिरीष मुंबईत एका चांगल्या कंपनीत सेल्स मॅनेजर म्हणून कार्यरत होता, तर त्याची पत्नी पूजाने बॉलिवूडमध्ये कला दिग्दर्शक म्हणून काम केले होते. २०२० मध्ये कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे दोघांनीही आपल्या नोकऱ्या गमावल्या. या कठीण काळात खचून न जाता, त्यांनी मुंबई सोडून सिंधुदुर्गातील आपल्या सासोली गावी परतण्याचा निर्णय घेतला.

गावी आल्यानंतर, चिनी युट्यूबर लिझिकी (Li Ziqi) पासून प्रेरणा घेत त्यांनी स्वतःच्या मातीशी जोडलेले काहीतरी सुरू करण्याचा विचार केला. यातूनच ‘रेड सॉईल स्टोरीज’ या युट्यूब चॅनलचा जन्म झाला. पूजा चुलीवर अस्सल कोकणी पदार्थ बनवायची आणि शिरीश आपल्या कॅमेऱ्यातून कोकणचे निसर्गरम्य जीवन, शेती आणि संस्कृती जगासमोर मांडायचा. कोणताही अनुभव नसताना केवळ आपल्या अस्सलपणामुळे त्यांच्या चॅनलने अल्पावधीतच ४ लाखांहून अधिक सबस्क्रायबर्सचा टप्पा ओलांडला आणि त्यांचे व्हिडिओ ४० पेक्षा जास्त देशांमध्ये पाहिले जाऊ लागले.

शिरीष गवस यांच्यासोबत नेमकं काय घडलं त्या १०-१२ दिवसांत?

सर्व काही सुरळीत सुरू असताना, शिरीशला अधूनमधून डोकेदुखीचा त्रास जाणवत होता. स्क्रिन टाइममुळे किंवा कामाच्या ताणामुळे हा त्रास होत असावा, असे समजून त्याने स्थानिक डॉक्टरांकडून तात्पुरते उपचार घेतले होते.

मात्र, २२ जुलै रोजी त्याला अचानक फिट आली आणि तो जवळपास चार तास बेशुद्ध होता. त्याला तातडीने गोव्यातील बांबोळी येथील गोवा मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले. तेथे तपासणी केली असता, त्याला ब्रेन ट्युमर असल्याचे निदान झाले, जे सर्वांसाठी एक मोठा धक्का होता. डॉक्टरांनी २३ आणि २४ जुलै रोजी दोन मोठ्या शस्त्रक्रिया करून त्याच्या मेंदूतून ट्युमर काढला. पण, शस्त्रक्रियेनंतर झालेल्या इन्फेक्शनमुळे त्याची प्रकृती खालावत गेली आणि रिपोर्ट येण्यापूर्वीच १ ऑगस्ट रोजी त्याची प्राणज्योत मालवली.

चाहत्यांकडून हळहळ, मुलीच्या वाढदिवसाचा व्हिडिओ ठरला अखेरचा

शिरीशने काही आठवड्यांपूर्वीच आपली मुलगी ‘श्रीजा’ हिच्या पहिल्या वाढदिवसाचा व्हिडिओ चॅनलवर शेअर केला होता. हाच त्याच्या आयुष्यातील शेवटचा व्हिडिओ ठरेल, याची कोणी कल्पनाही केली नव्हती. २ ऑगस्ट रोजी त्याच्या सासोली गावामध्ये त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. एका हसत्या-खेळत्या, जिद्दी आणि हरहुन्नरी तरुणाच्या अशा अकाली जाण्याने सोशल मीडियावर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

शिरीश आज आपल्यात नसला तरी, त्याने ‘रेड सॉईल स्टोरीज’च्या माध्यमातून दाखवलेला अस्सल कोकण आणि त्याचा तो हसरा चेहरा कायम आठवणीत राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed