जामनेर, जिल्हा जळगाव: येथील उपजिल्हा रुग्णालयाबाहेर सोमवारी रात्री तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मोठ्या संख्येने जमलेला संतप्त जमाव आणि पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त यांमुळे परिसरात भीतीचे सावट पसरले होते. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून दंगल नियंत्रण पथक आणि स्वतः जळगावचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. या सर्व तणावाचे कारण होते, जामनेर शहरात दिवसाढवळ्या घडलेली एक थरारक घटना.
कॅफेमधून उचलून नेले आणि अमानुष मारहाण
शहरातील एका कॅफेमध्ये घुसून १० ते १२ जणांच्या जमावाने सुलेमान पठाण (वय २०) या तरुणाला बेदम मारहाण केली. या मारहाणीत सुलेमानचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर सुलेमानचे कुटुंबीय आणि गावकरी आक्रमक झाले आणि त्यांनी उपजिल्हा रुग्णालयाबाहेर धाव घेत आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली.

जामनेर हत्याकांड काय आहे नेमके प्रकरण?
जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील बेटावत खुर्द येथील रहिवासी असलेले रहीम पठाण हे आपल्या पत्नी तबस्सुम, मुलगा सुलेमान आणि मुलगी मुस्कान यांच्यासोबत शेती करून उदरनिर्वाह करतात. सोमवारी सकाळी सुलेमान नोकरीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याकरिता जामनेर शहरात गेला होता. मात्र, तो घरी परतलाच नाही. दुपारी साडेचारच्या सुमारास, गावातीलच डोंगरसिंग राजपूत यांनी सुलेमानचे वडील रहीम पठाण यांना फोन करून कळवले की, बेटावत खुर्द बस स्थानकावर १० ते १५ जण सुलेमानला जबर मारहाण करत आहेत.
ही माहिती मिळताच रहीम पठाण यांनी पत्नी आणि मुलीसह बस स्थानकाकडे धाव घेतली. तिथे त्यांना सुलेमान अर्धनग्न अवस्थेत जखमी होऊन पडलेला दिसला. जमाव त्याला काठ्या, लोखंडी रॉड आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करत होता. कुटुंबीयांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता, जमावाने त्यांनाही शिवीगाळ करत मारहाण केली आणि कुटुंबाची इज्जत लुटण्याची धमकी दिली. जमाव पांगल्यानंतर कुटुंबीयांनी सुलेमानला घरी आणले.
घरी आणल्यावर पाणी पित असतानाच सुलेमानला भोवळ आली आणि तो खाली कोसळला. त्याला तातडीने जामनेरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.
प्रेमसंबंध की ‘लव्ह जिहाद’?
स्थानिक पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार, सुलेमानचे एका अल्पवयीन मुलीसोबत प्रेमसंबंध होते आणि ती मुलगी दुसऱ्या समाजातील होती. आरोपी गेल्या काही दिवसांपासून सुलेमानवर पाळत ठेवून होते. सोमवारी तो आपल्या मैत्रिणीसोबत कॅफेत असल्याची माहिती मिळताच आरोपींनी तिथे पोहोचून त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली.
कुटुंबीयांनी केलेल्या आरोपानुसार, आरोपींनी सुलेमानला कॅफेतून उचलून एका अज्ञातस्थळी नेले. तिथे त्याचे कपडे काढून, पायाची नखे उपटून त्याला विवस्त्र अवस्थेत बेदम मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्याला अर्धनग्न अवस्थेतच बेटावत खुर्दच्या बस स्थानकावर आणून पुन्हा मारहाण केली. या प्रकरणात ‘लव्ह जिहाद’चा अँगल असल्याचीही चर्चा सुरू झाली आहे, मात्र पोलिसांनी अद्याप याला दुजोरा दिलेला नाही.
पोलिसांची कारवाई आणि तपासाची दिशा
सुलेमानच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी १० ते १२ अज्ञातांविरोधात भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. सुलेमानच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिषेक राजपूत, रणजीत माताडे, आदित्य देवरे, सोज्वळ तेली, कृष्णा तेली आणि इतर काही जणांनी मारहाण केली. पोलिसांनी आतापर्यंत दोघांना ताब्यात घेतले असून, उर्वरित आरोपींचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखेची दोन आणि इतर दोन अशी एकूण चार पथके तयार करण्यात आली आहेत.
“कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये, पोलीस आपले काम करत आहेत. मारहाणीचे नेमके कारण तपासात समोर येईल,” असे आवाहन जळगावचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी केले आहे.
मंगळवारी दुपारी सुलेमानच्या कुटुंबीयांच्या मागणीनुसार, जळगावच्या शासकीय रुग्णालयात त्याच्या मृतदेहाचे ‘इन कॅमेरा’ शवविच्छेदन करण्यात आले. आता शवविच्छेदन अहवालातून काय निष्पन्न होते आणि या प्रकरणाला कोणते नवीन वळण मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या घटनेमुळे केवळ जामनेरच नव्हे, तर संपूर्ण जळगाव जिल्हा हादरला आहे.
