लातूर राड्यानंतर ‘छावा’ संघटना पुन्हा चर्चेत; कोण आहेत अण्णासाहेब जावळे आणि काय आहे संघटनेचा आक्रमक इतिहास?

मुंबई: “छावाचा इतिहास आहे, आमच्या पद्धतीने धडा शिकवू, त्याला माफी नाही,” असा थेट इशारा छावा संघटनेने राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) सुरज चव्हाण यांना दिला आहे. लातूरमध्ये छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना झालेल्या मारहाणीमुळे संघटना आक्रमक झाली असून, या प्रकरणामुळे ‘छावा’ संघटनेचा आक्रमक इतिहास पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.


 

 

 

लातूरमध्ये नेमके काय घडले?

 

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा सभागृहात रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, त्यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी छावा संघटनेचे कार्यकर्ते राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना निवेदन देण्यासाठी गेले होते. मात्र, यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सुरज चव्हाण आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे आणि इतर कार्यकर्त्यांना मारहाण केली. या घटनेनंतर सुरज चव्हाण यांनी सोशल मीडियावर माफी मागितली, पण अजित पवार यांच्या आदेशानंतर त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. तरीही, “सत्तेचा माज आणि शेतकऱ्यांच्या मुलाला झालेल्या मारहाणीचा हिशोब चुकवावाच लागेल,” अशी भूमिका छावा संघटनेने घेतली आहे.


 

काय आहे छावा संघटना?

 

अखिल भारतीय छावा संघटनेची स्थापना अण्णासाहेब जावळे यांनी १९ फेब्रुवारी २००० रोजी शिवजयंतीच्या दिवशी केली. मराठा समाजावरील अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी आणि समाजाला संरक्षण देण्यासाठी ही संघटना उभारण्यात आली. या संघटनेचा कार्यकर्ता स्वतःला ‘मावळा’ म्हणवतो. ‘छावा’ हे नाव छत्रपती संभाजी महाराजांचे प्रतीक असून, अन्यायाविरोधात तलवार उपसणाऱ्या तरुणांची ओळख बनले.

कोण होते संस्थापक अण्णासाहेब जावळे?

धाराशिव जिल्ह्यातील एका शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या अण्णासाहेब जावळेंनी अत्यंत संघर्षमय परिस्थितीत शिक्षण पूर्ण केले. विद्यार्थीदशेतच त्यांच्या मनात अन्यायाविरुद्ध ठिणगी पेटली. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरावेळी झालेली दंगल पाहून त्यांनी मराठा तरुणांना एकत्र करण्याचा आणि त्यांच्या हक्कांसाठी लढण्याचा निर्णय घेतला. “हक्क कोणी देत नाही, तो मिळवावा लागतो,” या विचाराने त्यांनी संघटनेची स्थापना केली. आपल्या आक्रमक आणि तेजस्वी भाषणशैलीमुळे ते मराठा समाजाचे ‘क्रांतीसूर्य’ आणि एक लढाऊ नेते म्हणून ओळखले जाऊ लागले.


 

‘छावा’च्या आक्रमकतेचा इतिहास

 

छावा संघटना केवळ भाषणांपुरती मर्यादित नसून, त्यांची कृतीही तितकीच आक्रमक राहिली आहे.

  • अधिकाऱ्याला मारहाण: एका तरुणीवर अत्याचार करणाऱ्या क्लास-वन अधिकाऱ्याला अण्णासाहेब जावळेंनी थेट कार्यालयात घुसून ‘छावा स्टाईल’ने मारहाण केली होती. त्यावेळी लातूरचे असूनही मुख्यमंत्री विलासराव देशमुखांचा विचार न करता त्यांनी पीडितेला न्याय मिळवून दिला.
  • वाजपेयींची सभा उधळली: जेम्स लेन या लेखकाने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह लिखाण केल्यानंतर, तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची लातूरमधील सभा छावा संघटनेने उधळून लावली होती.
  • अडवाणींची रथयात्रा रोखली: केंद्रीय गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी यांची औसा येथील रथयात्राही छावा संघटनेने अडवली होती.

 

अण्णासाहेब जावळेंनंतरची ‘छावा’

 

५ एप्रिल २०१३ रोजी अण्णासाहेब जावळे यांच्या निधनानंतर त्यांचे भाऊ नानासाहेब जावळे संघटनेचे अध्यक्ष झाले. त्यांनी संघटनेचा आक्रमक वारसा पुढे चालू ठेवला. मराठा आरक्षणासाठी २०१८ मध्ये मुंबईत १८ दिवस आंदोलन करणे, मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देणे, अशा अनेक मार्गांनी संघटना आजही सक्रिय आहे.

लातूरमधील ताज्या प्रकरणामुळे, ‘छावा’ संघटनेचा हाच आक्रमक इतिहास पुन्हा समोर आला आहे. “आमच्या पद्धतीने धडा शिकवू” या इशाऱ्यामुळे आता पुढे काय होणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed