इंदापूर, भोर, पुरंदर… बारामती जिंकण्यासाठी भाजपचा नवा ‘मेगा प्लॅन’; अजितदादांचे वाढले टेन्शन!

मुंबई: बारामती लोकसभा मतदारसंघ, म्हणजेच शरद पवारांचा बालेकिल्ला. हा गड जिंकण्याचे भाजपचे स्वप्न अनेक वर्षांपासूनचे आहे. २०१४ आणि २०१९ मध्ये जोरदार प्रयत्न करूनही भाजपला येथे यश आले नाही. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ‘पवार विरुद्ध पवार’ लढाईत शरद पवारांनी बाजी मारली आणि भाजप बाजूला राहिली. पण आता भाजपने २०२९ च्या तयारीसाठी आतापासूनच एक वेगळी आणि मोठी ‘फिल्डिंग’ लावायला सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे, ही रणनीती थेट मित्रपक्ष असलेल्या अजित पवारांसाठीच भविष्यात डोकेदुखी ठरू शकते, अशी चिन्हे दिसू लागली आहेत.

गेल्या काही दिवसांतील मोठ्या पक्षप्रवेशांवर नजर टाकल्यास भाजपची बारामती जिंकण्याची नवी रणनीती स्पष्ट होते.

 

 

१. पुरंदरमध्ये काँग्रेसला धक्का, संजय जगताप भाजपमध्ये

बुधवारी, १६ जुलै रोजी पुरंदर-हवेलीचे काँग्रेसचे माजी आमदार आणि जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. जगताप यांची पुरंदरमधील सहकार क्षेत्रावर (शिक्षण, बँकिंग, दूध व्यवसाय) मजबूत पकड आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्यामुळेच सुप्रिया सुळे यांना पुरंदरमधून ३५,२८१ मतांची निर्णायक आघाडी मिळाली होती. आता तोच महत्त्वाचा नेता भाजपने आपल्या गोटात खेचून आणला आहे. विशेष म्हणजे, जगतापांचा पक्षप्रवेश मुंबईत न करता, थेट पुरंदरमधील सासवड येथे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावरून भाजपने बारामती मतदारसंघावर किती लक्ष केंद्रित केले आहे, हे दिसून येते.

२. इंदापूरमध्ये प्रवीण मानेंच्या माध्यमातून ताकद वाढवली

सोनाई उद्योग समूहाचे संचालक आणि माजी जिल्हा परिषद सभापती प्रवीण माने यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. ‘सोनाई दूध’च्या माध्यमातून माने यांनी इंदापूर तालुक्यात मोठा जनसंपर्क आणि लाभार्थी वर्ग तयार केला आहे. लोकसभा निवडणुकीत सुरुवातीला सुप्रिया सुळेंचा प्रचार करणाऱ्या मानेंनी ऐनवेळी अजित पवारांना साथ दिली होती. विधानसभेत अपक्ष लढून त्यांनी ३७ हजारांपेक्षा जास्त मते घेतली होती, ज्यामुळे हर्षवर्धन पाटलांचा पराभव झाला होता. आता त्याच मानेंना पक्षात घेऊन भाजपने अजित पवारांचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्यासमोर इंदापूरमध्ये एक तगडे आव्हान उभे केले आहे.

३. भोरचा ‘थोपटे’ गडही भाजपने सर केला

भोर विधानसभा मतदारसंघ म्हणजे ‘थोपटे कुटुंब’ हे समीकरण राज्यात सर्वश्रुत आहे. काँग्रेसचा हा पारंपरिक गड मानला जातो. संग्राम थोपटे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या ताकदीमुळेच सुप्रिया सुळे यांना भोरमधून तब्बल ४३,८०५ मतांची आघाडी मिळाली होती. शरद पवारांनी स्वतः थोपटे यांच्या घरी जाऊन जुने राजकीय वैर संपवले होते. विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले असले तरी, संग्राम थोपटे यांना १ लाखापेक्षा जास्त मते मिळाली होती. आता याच थोपटेंना पक्षात घेऊन भाजपने भोरमध्ये आपली उपस्थिती मजबूत केली आहे, जिथे पूर्वी भाजपची ताकद नगण्य होती.

भाजपच्या ‘फिल्डिंग’मुळे कोंडी सुप्रिया सुळेंची की अजित पवारांची?

या पक्षप्रवेशांमुळे बारामती लोकसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत.

  • दौंड: आमदार राहुल कुल (भाजप)
  • खडकवासला: आमदार भीमराव तापकीर (भाजप)
  • पुरंदर: संजय जगताप (आता भाजपमध्ये)
  • इंदापूर: प्रवीण माने (आता भाजपमध्ये)
  • भोर: संग्राम थोपटे (आता भाजपमध्ये)

वरील पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपने एकतर स्वतःचे आमदार निवडून आणले आहेत किंवा आता स्थानिक पातळीवर अत्यंत मजबूत असलेल्या नेत्यांना पक्षात घेतले आहे. त्यामुळे प्रश्न उरतो तो फक्त बारामती विधानसभा मतदारसंघाचा, जिथे अजित पवार स्वतः आमदार आहेत.

यामुळे सुप्रिया सुळे यांची ताकद कमी झाली आहे, हे उघड आहे. ज्या स्थानिक नेत्यांच्या जिवावर त्या विजयी झाल्या, तेच नेते आता भाजपसोबत आहेत. पण खऱ्या अर्थाने राजकीय कोंडी झाली आहे ती अजित पवारांची.

२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत अजित पवारांनी बारामतीसोबतच इंदापूर आणि भोरमध्येही आपले उमेदवार निवडून आणत आपले वर्चस्व सिद्ध केले होते. २०२९ च्या लोकसभेसाठी ते याच आमदारांच्या ताकदीवर अवलंबून राहणार होते. मात्र, भाजपने आता याच मतदारसंघांमध्ये मित्रपक्षाला डावलून स्वतःचे पर्यायी सत्ताकेंद्र निर्माण केले आहे. अजित पवारांच्या आमदारांसमोर तगडे स्थानिक नेते उभे करून भाजपने एकप्रकारे अजित पवारांनाच आव्हान दिले आहे. त्यामुळे भविष्यात बारामतीच्या जागेवर नैसर्गिक हक्क सांगणाऱ्या अजित पवारांना भाजपच्या या वाढत्या ताकदीमुळे बॅकफूटवर जावे लागते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed