नवी दिल्ली: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ७ ऑगस्ट रोजी केलेल्या ‘वोट चोरी’च्या गंभीर आरोपांना तब्बल दहा दिवसांनी, रविवारी (१७ ऑगस्ट) निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन सडेतोड उत्तर दिले. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राहुल गांधींचे नाव न घेता त्यांच्या प्रत्येक आरोपाचा समाचार घेतला. “एकतर प्रतिज्ञापत्रावर पुरावे सादर करा, नाहीतर देशाची माफी मागा, तिसरा कोणताही पर्याय नाही,” असा थेट इशारा देत आयोगाने राहुल गांधींना सात दिवसांची मुदत दिली आहे.
७ ऑगस्ट रोजी राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेत, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत आणि त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपासोबत संगनमत करून आयोगाने ‘वोट चोरी’ केल्याचा आरोप केला होता. यानंतर देशाच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती.
निवडणूक आयोगाच्या उत्तराचे प्रमुख मुद्दे:
१. पुरावे द्या किंवा माफी मागा – तिसरा पर्याय नाही
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार म्हणाले, “निवडणुकीत चुका झाल्याचे वाटत असेल तर अर्ज करण्यासाठी योग्य वेळ असते. ती निघून गेल्यावर ‘वोट चोरी’ सारखे शब्द वापरून जनतेची दिशाभूल करणे हा लोकशाहीचा अपमान आहे. ज्यांनी हे आरोप केले आहेत, त्यांना सात दिवसांच्या आत प्रतिज्ञापत्रावर पुरावे सादर करावे लागतील. जर प्रतिज्ञापत्र आले नाही, तर हे सर्व आरोप निराधार असल्याचे मानले जाईल.”
२. मतदारांचा अपमान सहन करणार नाही
“काही लोक ‘वोट चोरी’चे आरोप करून सर्व मतदारांनाच गुन्हेगार ठरवत आहेत. निवडणूक आयोगाच्या खांद्यावर बंदूक ठेवून मतदारांना लक्ष्य केले जात आहे, हे आयोग सहन करणार नाही. अशा खोट्या आरोपांना ना आयोग घाबरतो, ना मतदार,” असे म्हणत आयुक्तांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
३. राहुल गांधींचा डेटा आमचा नाही
राहुल गांधींनी पीपीटी सादरीकरण करून जे आकडे दाखवले, तो डेटा निवडणूक आयोगाचा नसल्याचा दावा ज्ञानेश कुमार यांनी केला. ते म्हणाले, “आयोगाचा नसलेला डेटा दाखवून चुकीचे विश्लेषण करणे आणि एका महिलेने दोनदा मतदान केल्यासारखे गंभीर आरोप करणे चुकीचे आहे. आम्ही अशा आरोपांवर प्रतिज्ञापत्राशिवाय कारवाई करू शकत नाही.”
४. महाराष्ट्र आणि बिहारच्या आरोपांवर स्पष्टीकरण
- महाराष्ट्र: राहुल गांधींनी महाराष्ट्रात मतदानाच्या शेवटच्या तासात मोठी तफावत असल्याचा आरोप केला होता. यावर आयुक्त म्हणाले, “निवडणुका होऊन आठ महिने झाले, पण आजपर्यंत एकाही मतदाराचे नाव पुराव्यासह निवडणूक अधिकाऱ्यांकडे आलेले नाही. कोणी वीस वेळा खोटे बोलले तरी ते खरे होत नाही. सूर्य पश्चिमेला उगवत नाही.”
- बिहार: बिहारमधील मतदार यादी सुधारणेच्या (SIR) प्रक्रियेवर बोलताना ते म्हणाले, “ही प्रक्रिया गेल्या दोन दशकांपासून प्रलंबित होती. कायद्यानुसार प्रत्येक निवडणुकीपूर्वी मतदार यादी दुरुस्त करणे ही आयोगाची जबाबदारी आहे. या प्रक्रियेत सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी सहभागी होते आणि अजूनही त्रुटी दूर करण्यासाठी १५ दिवसांचा अवधी आहे.”
५. निवडणूक प्रक्रियेत चोरी शक्य नाही
“लोकसभा निवडणुकीच्या प्रक्रियेत एक कोटीपेक्षा जास्त कर्मचारी, १० लाखांपेक्षा जास्त बूथ एजंट आणि २० लाखांहून अधिक पोलिंग एजंट काम करतात. इतक्या लोकांसमोर, इतक्या पारदर्शक प्रक्रियेत मतांची चोरी कशी होऊ शकते?” असा सवाल आयुक्तांनी उपस्थित केला.
काँग्रेसचा पलटवार: आयोगाचा दावा म्हणजे एक जोक
निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेनंतर काँग्रेसनेही तातडीने प्रतिक्रिया दिली. काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणाले, “निवडणूक आयोगाचा पक्षपातीपणा आज पूर्णपणे उघड झाला आहे. राहुल गांधी जे काही बोलले, ते आयोगाच्याच डेटावर आधारित आहे. आयोगाने त्यांच्या प्रश्नांना कोणतेही अर्थपूर्ण उत्तर दिले नाही. आम्ही सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये भेद करत नाही, हा आयोगाचा दावा म्हणजे एक मोठा जोक आहे.”
आता निवडणूक आयोगाने दिलेल्या सात दिवसांच्या अल्टिमेटमनंतर राहुल गांधी प्रतिज्ञापत्र सादर करतात की नाही, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. या प्रकरणामुळे निवडणूक आयोग आणि विरोधी पक्षांमधील संघर्ष अधिकच तीव्र झाला आहे.