बंगळूर: भारताचे माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांचे नातू आणि कर्नाटकच्या हासन मतदारसंघाचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा यांना लैंगिक अत्याचार प्रकरणात बंगळूरच्या विशेष न्यायालयाने शुक्रवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. आपल्याच घरी काम करणाऱ्या महिलेवर दोन वेळा बलात्कार केल्याच्या आरोपाखाली त्यांना दोषी ठरवण्यात आले. यासोबतच न्यायालयाने त्यांना दहा लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. न्यायालयाचा निकाल ऐकताच प्रज्वल रेवण्णा कोर्टातच रडू लागले.
प्रकरण काय आहे?
हे संपूर्ण प्रकरण गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीपूर्वी उघडकीस आले होते, जेव्हा प्रज्वल रेवण्णा यांच्याशी संबंधित सुमारे ३,००० आक्षेपार्ह व्हिडिओ क्लिप्स आणि काही फोटो असलेले पेनड्राईव्ह हसन जिल्ह्यात आणि बंगळूरच्या काही भागांमध्ये वाटण्यात आले होते. सुरुवातीला रेवण्णा यांनी हे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप केला होता. मात्र, प्रकरण गंभीर झाले जेव्हा त्यांच्या घरी काम केलेल्या ४७ वर्षीय महिलेने पुढे येऊन प्रज्वल आणि त्याचे वडील एच.डी. रेवण्णा यांच्याविरोधात लैंगिक अत्याचाराची तक्रार दाखल केली.
या प्रकरणानंतर राज्य सरकारने विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना केली. प्रकरण उघडकीस येताच प्रज्वल रेवण्णा जर्मनीला पळून गेले होते, परंतु ३१ मे रोजी बंगळूर विमानतळावर परतताच त्यांना अटक करण्यात आली.
प्रज्वल रेवण्णा वर पीडितेचे आरोप आणि महत्त्वाचे पुरावे
पीडित महिलेने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, २०२१ मध्ये प्रज्वलने तिच्यावर दोन वेळा बलात्कार केला. एकदा हसन येथील घरात आणि दुसऱ्यांदा बसवनगुडी येथील घरी. याबाबत कोणाला सांगितल्यास व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकीही त्याने दिली होती.
या खटल्यातील सर्वात महत्त्वाचा पुरावा ठरला तो म्हणजे घटनेच्या चार वर्षांनंतरही पीडितेच्या साडीवर आणि अंतर्वस्त्रांवर सापडलेले स्पर्मचे डाग. फॉरेन्सिक तपासणीत हा डीएनए प्रज्वल रेवण्णाच्या डीएनएशी जुळला. याशिवाय, अत्याचाराच्या व्हिडिओ क्लिपमध्ये पीडितेचा विरोध आणि रडणे स्पष्ट दिसत होते. या सर्व पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने प्रज्वलला दोषी ठरवले.
न्यायालयीन प्रक्रिया आणि शिक्षा
या खटल्याची सुनावणी १५ महिन्यांत ३८ वेळा झाली. न्यायालयात १०० पेक्षा जास्त साक्षीदार तपासण्यात आले आणि १८० कागदपत्री पुरावे सादर करण्यात आले. अखेर १ ऑगस्ट २०२५ रोजी विशेष न्यायालयाचे न्यायाधीश संतोष भट यांनी प्रज्वलला दोषी ठरवले आणि दुसऱ्या दिवशी, २ ऑगस्ट रोजी, जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
शिक्षेपूर्वी बोलण्याची संधी दिली असता प्रज्वलने म्हटले, “माझी एकच चूक होती, ती म्हणजे इतक्या कमी वेळात झालेली माझी राजकीय प्रगती.” माझ्याविरोधात महिलांना तक्रारी देण्यास भाग पाडण्यात आले, असा दावाही त्याने केला.
राजकीय कुटुंबाला मोठा धक्का
प्रज्वल रेवण्णा हे माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांचे नातू आहेत. त्यांचे वडील एच.डी. रेवण्णा आमदार आहेत, तर काका एच.डी. कुमारस्वामी हे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि सध्या केंद्रीय मंत्री आहेत. या प्रकरणामुळे कर्नाटकातील या मोठ्या राजकीय कुटुंबाच्या प्रतिष्ठेला मोठा धक्का बसला आहे. प्रज्वलवर आणखी तीन गुन्हे दाखल असून, त्यांचा निकाल अद्याप बाकी आहे. या निकालानंतर रेवण्णा कुटुंबातील अंतर्गत मतभेदही समोर आले आहेत. “ज्याने चूक केली आहे, त्यालाच त्याचे फळ भोगावे लागेल,” अशी प्रतिक्रिया एच.डी. कुमारस्वामी यांनी दिली आहे.