पुणे: दौंड तालुक्यातील यवत गावात शुक्रवारी, १ ऑगस्ट रोजी एका सोशल मीडिया पोस्टमुळे दोन गटांमध्ये वाद भडकून त्याचे रूपांतर मोठ्या राड्यात झाले. या घटनेत दोन्ही गटांकडून एकमेकांवर प्रचंड दगडफेक करण्यात आली, तसेच काही दुचाकी जाळण्यात आल्या. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. या घटनेनंतर गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, सध्या तणावपूर्ण शांतता आहे.
यवत मध्ये नेमकं काय घडलं?
माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी एका तरुणाने सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने गावात संतापाचे वातावरण पसरले. परिस्थिती चिघळण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने दुपारनंतर आठवडी बाजार बंद करण्याचा निर्णय घेतला. मात्र, तोपर्यंत तणाव वाढला होता.
आक्षेपार्ह पोस्ट करणारा तरुण यवतमधील सहकार नगर परिसरात राहत असल्याची माहिती मिळताच संतप्त जमावाने त्याच्या घरावर हल्ला करत दगडफेक आणि तोडफोड केली. यानंतर जमावाने गावातील काही दुचाकी पेटवून दिल्या. काही वृत्तांनुसार, गावातील एका धार्मिक स्थळाची तोडफोड करून त्यावर झेंडे लावल्याचे व्हिडिओ देखील व्हायरल झाले, ज्यामुळे दुसऱ्या गटानेही यात उडी घेतली आणि दोन्ही गटांमध्ये थेट संघर्ष सुरू झाला.
पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेतल्यामुळे मोठा अनर्थ टळला. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्यांचा वापर केला. पुणे पोलिसांच्या विशेष तुकडीसह वरिष्ठ पोलीस अधिकारी गावात तळ ठोकून आहेत. आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याची चौकशी सुरू असल्याचे यवतचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी सांगितले.
यवतमधील वादाची पार्श्वभूमी: गेल्या आठवड्यापासून धुमसणारा तणाव
शुक्रवारची घटना अचानक घडली असली तरी, यवत गावात गेल्या आठवड्याभरापासून तणाव धुमसत होता.
- २६ जुलै: यवत रेल्वे स्टेशनजवळील नीळकंठेश्वर मंदिर परिसरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रकार घडला. अमित सय्यद नावाच्या आरोपीला पोलिसांनी ३० जुलै रोजी अटक केली.
- ३१ जुलै: या विटंबनेच्या निषेधार्थ गुरुवारी यवतमध्ये ‘सकल हिंदू जन आक्रोश मोर्चा’ काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी केले.
या मोर्चादरम्यान दोन्ही नेत्यांनी प्रक्षोभक भाषणे केल्याचे समोर आले आहे. आमदार पडळकर म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला हात घालण्याची हिंमत येते कुठून? यामागे मोठे षडयंत्र आहे. पोलिसांनी मुळापर्यंत जाऊन त्याचं घर पाडता येतंय का बघा. राज्यात मुख्यमंत्री खमका आहे, करा धाडस.”
तर आमदार संग्राम जगताप म्हणाले, “या परिसरातले लोक गप्प का, याची खंत आहे. ॲक्शनला रिएक्शन ताबडतोब यायला हवी होती. हा ५०० वर्षांचा इतिहास कोणी पुसण्याचा प्रयत्न करत असेल, तर ही झुरळं पायाखाली तुडवणं ही पोलिसांची जबाबदारी आहे.”
या भाषणानंतर दुसऱ्याच दिवशी आक्षेपार्ह पोस्टचे निमित्त होऊन हा हिंसाचार भडकला.
राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया
घटनेचे गांभीर्य ओळखून उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी तातडीने यवतकडे धाव घेतली.
- आमदार राहुल कुल (दौंड): “गेल्या काही दिवसांपासून गावात तणाव होता. सर्वांशी संवाद साधून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे.”
- आमदार जितेंद्र आव्हाड: “ज्या भागांमध्ये कधी जातीय तणाव झाले नाहीत, तिथे आता राजकीय हितासाठी महाराष्ट्राचे स्वास्थ्य खराब करण्याचे काम सुरू आहे. हे निंदनीय आहे.”
- आमदार गोपीचंद पडळकर: “ही सामान्य माणसाने केलेली प्रकरणे नाहीत. यामागे षडयंत्र आहे. लोकांच्या अस्मितेवर आणि स्वाभिमानावर घाला घालण्याचा हा डाव आहे.”
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस: “सर्वांनी शांतता राखावी, कायदा कोणी हातात घेऊ नये. जाणीवपूर्वक तणाव पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.”
सध्या पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली असली तरी, गावात भीतीचे आणि दहशतीचे वातावरण आहे. प्रशासनाने नागरिकांना शांतता राखण्याचे आणि कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.