मुंबई: मुंबईची ओळख असलेला आणि जवळपास ९० वर्षांचा इतिहास लाभलेला दादर येथील प्रसिद्ध कबुतरखाना अखेर मुंबई महानगरपालिकेने बंद केला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही या ठिकाणी कबुतरांना खाद्य घालणे सुरूच असल्याने, २ ऑगस्टच्या रात्री उशिरा पालिकेने कारवाई करत संपूर्ण कबुतरखाना ताडपत्रीने झाकून टाकला. प्रशासनाच्या या कारवाईमुळे आता एक नवा वाद निर्माण झाला असून, जैन समाजाने याविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या मुद्द्याला आता राजकीय वळणही मिळू लागले आहे.
कबुतरखाना मध्ये नेमके काय घडले?
मुंबई उच्च न्यायालयाने काही काळापूर्वी कबुतरखान्यात कबुतरांना खाद्य देण्यावर बंदी घातली होती. कबुतरांच्या विष्ठेमुळे श्वसनाचे आजार पसरत असल्याच्या तक्रारींनंतर हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, न्यायालयाच्या आदेशानंतरही अनेक नागरिक येथे कबुतरांना दाणे टाकत होते. अखेर, पालिका प्रशासनाने कठोर पाऊल उचलत २ ऑगस्ट रोजी रात्री संपूर्ण कबुतरखाना सील केला.
कबुतरखाना बंदी विरीधात जैन समाजाचा तीव्र विरोध आणि आंदोलनाचा इशारा
या कारवाईनंतर जैन समाज आणि इतर पक्षीप्रेमी आक्रमक झाले आहेत. ३ ऑगस्ट रोजी दक्षिण मुंबईत एक मोठे विरोध प्रदर्शन करण्यात आले, ज्यात जैन मुनीही सहभागी झाले होते. “हा निर्णय आमच्या धर्माच्या विरोधात आहे. लाखो कबुतरे दाणा-पाण्याविना तडफडत आहेत. उच्च न्यायालयाच्या निकालाची आम्ही वाट पाहत आहोत, पण तोपर्यंत जर काही तोडगा निघाला नाही, तर १० तारखेनंतर राज्यव्यापी आंदोलन छेडले जाईल,” असा इशारा जैन मुनींनी दिला आहे. भाजप नेते मंगलप्रभात लोढा यांनीही नागरिकांच्या भावनांचा आदर करण्याची विनंती केली आहे.
राजकीय पक्षांच्या उड्या; मनसेचा वेगळा सूर
या मुद्द्यावरून आता राजकारणही तापू लागले आहे. एकीकडे जैन समाज आणि भाजप नेत्यांनी या कारवाईला विरोध केला आहे, तर दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) या कबुतरखान्यांमुळे निर्माण होणाऱ्या धोक्यांकडे लक्ष वेधले आहे. कबुतरांच्या वाढत्या संख्येमुळे आरोग्याचे प्रश्न गंभीर होत असल्याचे मनसेचे म्हणणे आहे. काही दिवसांपूर्वीच, मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत मुंबईतील सर्व ५१ कबुतरखाने बंद करण्याचे निर्देश दिले होते, त्यानंतर या कारवाईला वेग आला.
कबुतरखान्यांचा गौरवशाली इतिहास
मुंबईतील कबुतरखान्यांना एक मोठा सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा आहे. दादर येथील कबुतरखान्याची निर्मिती १९३३ साली एका पाण्याच्या कारंज्याच्या रूपात झाली होती. पुढे, जैन समाजाच्या विनंतीवरून १९४४ मध्ये तत्कालीन बॉम्बे नगरपालिकेने येथे कबुतरांसाठी अधिकृत जागा दिली. आज ही वास्तू ‘ग्रेड-२ हेरिटेज’ म्हणून ओळखली जाते. जैन आणि इतर अनेक धर्मांमध्ये पक्षांना दाणे घालणे हे एक पवित्र कार्य मानले जाते आणि याच भावनेतून मुंबईत अनेक कबुतरखाने उभे राहिले.
सध्या मुंबईत एकूण ५१ कबुतरखाने असून, ते सर्व बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या कारवाईमुळे मुंबईची एक ओळख पुसली जात असल्याची भावना काही नागरिक व्यक्त करत आहेत, तर आरोग्याच्या दृष्टीने ही कारवाई योग्य असल्याचे मत काहीजण मांडत आहेत. आता या प्रकरणी उच्च न्यायालय काय निर्णय देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.