जयंत पाटलांनी साधला तिहेरी डाव?
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या पदाचा अधिकृत राजीनामा दिला असून, त्यांच्या जागी पक्षाचे निष्ठावंत नेते आणि माजी आमदार शशिकांत शिंदे यांची नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. मंगळवारी (१५ जुलै) झालेल्या पक्षाच्या महत्त्वपूर्ण बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
वरकरणी हा संघटनात्मक बदल दिसत असला तरी, यामागे जयंत पाटील यांची मोठी राजकीय खेळी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. एकीकडे भाजप प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम देत, दुसरीकडे पक्षात आपला प्रभाव कायम ठेवत जयंत पाटील यांनी एकाच वेळी तीन आघाड्यांवर डाव साधल्याचे मानले जात आहे.
१. जयंत पाटलांचा डाव पहिला: साताऱ्याच्या गडावर पुन्हा पकड
सातारा जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, २०१९ नंतर भाजपने उदयनराजे भोसले, शिवेंद्रराजे भोसले यांच्यासारख्या महत्त्वाच्या नेत्यांना आपल्या गोटात खेचून पवारांच्या या गडाला सुरुंग लावला. सध्या शरद पवार गटाचा एकही आमदार जिल्ह्यात नाही. अशा परिस्थितीत, साताऱ्याचेच भूमिपुत्र असलेल्या शशिकांत शिंदे यांना प्रदेशाध्यक्ष पद देऊन जयंत पाटील आणि शरद पवार यांनी भाजप व अजित पवार गटाला थेट आव्हान दिले आहे. या नियुक्तीमुळे स्थानिक कार्यकर्त्यांना बळ मिळेल आणि पश्चिम महाराष्ट्रात, विशेषतः सहकार क्षेत्रात पक्षाची गेलेली ताकद परत मिळवण्यासाठी मदत होईल, अशी ही रणनीती आहे.
२. डाव दुसरा: पक्षांतर्गत गटबाजीला शह
राष्ट्रवादीत फूट पडल्यापासून पक्षात सुप्रिया सुळे-रोहित पवार गट आणि जयंत पाटील गट असे दोन गट सक्रिय असल्याची चर्चा होती. जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याने त्यांचे पक्षातील महत्त्व कमी होईल, असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र, शशिकांत शिंदे हे जयंत पाटील यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्याच वेळी, त्यांची प्रतिमा गटबाजीपासून अलिप्त आणि शरद पवारांशी निष्ठावंत अशी आहे. त्यामुळे शिंदे यांच्या नियुक्तीला पक्षात कोणताही विरोध होण्याची शक्यता नाही. या माध्यमातून प्रदेशाध्यक्षपदी आपला विश्वासू नेता बसवून जयंत पाटील यांनी पक्षावरील आपली पकड कायम ठेवली आहे आणि स्पर्धक गटांनाही शह दिला आहे.
३. डाव तिसरा: ‘मराठा + माथाडी’ मतांची बेरीज
शशिकांत शिंदे हे मराठा समाजाचे प्रतिनिधित्व करतात. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाचा पारंपरिक मराठा जनाधार कायम ठेवण्यासाठी ही निवड अत्यंत महत्त्वाची आहे. यासोबतच, शशिकांत शिंदे हे गेली २५ वर्षे माथाडी कामगारांचे नेतृत्व करत आहेत. मुंबई, ठाणे आणि आसपासच्या औद्योगिक पट्ट्यात माथाडी कामगारांची संख्या मोठी असून, हा एक मोठा आणि संघटित मतदार वर्ग आहे. आगामी महापालिका निवडणुकांमध्ये या वर्गाचा पाठिंबा मिळवणे शरद पवार गटासाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकते. अशा प्रकारे ‘मराठा + माथाडी’ हे समीकरण जुळवून जयंत पाटील यांनी मतांची बेरीज करण्याचा यशस्वी प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे.
एकंदरीत, जयंत पाटील यांचा राजीनामा आणि शशिकांत शिंदे यांची निवड हा केवळ एक संघटनात्मक बदल नसून, आगामी राजकीय आव्हानांना तोंड देण्यासाठी शरद पवार आणि जयंत पाटील यांनी आखलेली एक दूरगामी आणि बहुआयामी रणनीती मानली जात आहे.