कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेणाऱ्या कोल्हापूरच्या नांदणी गावातील महादेवी उर्फ माधुरी हत्तिणीचा विषय आता दिल्लीपर्यंत पोहोचला आहे. उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर महादेवीला गुजरातमधील वनतारा प्राणी कल्याण केंद्रात पाठवण्यात आले. या घटनेनंतर नांदणी गावात आणि संपूर्ण कोल्हापुरात तीव्र भावना व्यक्त होत असून, आता राजकीय नेतेही या प्रकरणात सक्रिय झाले आहेत.
गावकऱ्यांचा भावनिक लढा आणि ‘जिओ’वर बहिष्कार
महादेवी हत्तिणीला २८ जुलै रोजी वनतारा येथे हलवण्यात आले, त्यावेळी नांदणी गावावर शोककळा पसरली होती. केवळ गावकरीच नव्हे, तर खुद्द महादेवीच्या डोळ्यांतही अश्रू तरळल्याचे पाहून अनेकांची मने हेलावली. यानंतर संतप्त गावकऱ्यांनी महादेवीला परत आणण्यासाठी अनोखी मोहीम सुरू केली. वनताराचे मालक अंबानी यांच्या ‘जिओ’ कंपनीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय गावाने घेतला. “आमच्या महादेवीला तुमचे मालक घेऊन गेले, आम्हाला तुमचे सिम कार्ड नको,” असे खणखणीत उत्तर देत सुमारे ७,००० गावकऱ्यांनी आपले ‘जिओ’ सिम कार्ड दुसऱ्या कंपनीत पोर्ट केले. माजी खासदार राजू शेट्टी यांनीही आपले सिम कार्ड बदलून या मोहिमेला पाठिंबा दिला.
महादेवी हत्तीनीसाठी राजकीय नेत्यांची सक्रियता आणि सह्यांची मोहीम
महादेवीचा मुद्दा आता केवळ भावनिक न राहता राजकीय बनला आहे.
- राजू शेट्टी: त्यांनी या निर्णयाला ‘बड्या उद्योगपतीच्या बालहट्टासाठी समाजाच्या भावनांवर कुरघोडी’ म्हटले आहे. त्यांच्या नेतृत्वात गावकऱ्यांनी विराट मूक मोर्चा काढला असून, येत्या रविवारी नांदणी ते कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ‘आत्मक्लेश पदयात्रा’ काढणार आहेत.
- सतेज पाटील: काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी “एक स्वाक्षरी महादेवीला आपल्या घरी आणण्यासाठी” या नावाने भव्य स्वाक्षरी मोहीम सुरू केली. या मोहिमेला देशभरातून प्रचंड प्रतिसाद मिळाला असून, २४ तासांत १,२५,३५३ लोकांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. हे सर्व अर्ज राष्ट्रपती कार्यालयाकडे पाठवून महादेवीला परत देण्याची मागणी केली जाणार आहे.
- खासदार आणि मंत्री: भाजप खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्रीय वनमंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेऊन निवेदन दिले. तर, शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने यांनी थेट अनंत अंबानी यांच्याशी संपर्क साधला. या सर्वांच्या प्रयत्नांतूनच वनताराच्या अधिकाऱ्यांनी कोल्हापूरला भेट दिली.
वनतारा सीईओ आणि मठाधिपतींची बैठक
शुक्रवारी, १ ऑगस्ट रोजी वनताराचे सीईओ विहान करणी आणि त्यांच्या टीमने कोल्हापुरात येऊन नांदणी मठाचे मठाधिपती जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांची भेट घेतली. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीत, वनताराच्या सीईओने स्पष्ट केले की, “महादेवीला आणण्यामध्ये आमची कोणतीही भूमिका नाही. आम्ही केवळ सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले आहे. जर न्यायालयाने आदेश दिला, तर आम्ही महादेवीला परत करण्यास तयार आहोत. यासाठी लागणारे सर्व कायदेशीर सहकार्य करण्यास वनतारा तयार आहे.” प्रसंगी नांदणीत ‘वनतारा’चे एक युनिट सुरू करण्याचा प्रस्तावही त्यांनी दिला. मात्र, या बैठकीनंतर मठाधिपती नाराज होऊन निघून गेल्याचे दिसून आले.
पुढे काय?
सध्या महादेवीला परत आणण्यामध्ये सर्वात मोठा अडथळा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे. कायदेशीर प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची असल्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी स्पष्ट केले आहे. लोकभावनेचा आदर करत, शासन सर्वोच्च न्यायालयात ताकदीने बाजू मांडणार आहे. त्याचबरोबर, राष्ट्रपतींनी या प्रकरणात हस्तक्षेप करावा, अशी मागणी जोर धरत आहे. त्यामुळे आता या कायदेशीर लढाईत महादेवी नांदणीत परतणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.