मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) मराठा आरक्षण (Maratha Reservation) ओबीसी आरक्षण (OBC Reservation) चलो मुंबई आंदोलन (Chalo Mumbai Andolan) देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)

बीड: “सरकार काय, सरकारचा बाप पण आडवा येऊ दे, आरक्षण घेणारच आणि ते पण ओबीसीमधूनच!” या शब्दात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला थेट आव्हान दिले आहे. रविवारी, २४ ऑगस्ट रोजी बीड जिल्ह्यातील मांजरसुंभा येथे झालेल्या विराट सभेत ते बोलत होते. ‘चलो मुंबई’च्या घोषणेने दुमदुमलेल्या या सभेतून जरांगे यांनी २९ ऑगस्टला मुंबईत दाखल होण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले.

राज्य सरकारने २७ ऑगस्टपर्यंत मराठा समाजाच्या मागण्या मान्य कराव्या, अन्यथा मराठा समाज थांबणार नाही, असा इशारा यापूर्वीच देण्यात आला होता. मांजरसुंभा येथील सभेत मनोज जरांगे यांनी राज्य सरकारवर, विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली.

 

मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil)

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

ओबीसी आरक्षण (OBC Reservation)

चलो मुंबई आंदोलन (Chalo Mumbai Andolan)

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)

 

मराठा आरक्षण  “२९ ऑगस्टला मुंबईत या, ही शेवटची लढाई”

पावसाळा आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील मुंबई आंदोलनाचा निर्णय मागे घेतील, अशा चर्चांना त्यांनी पूर्णविराम दिला. “मराठा समाजावर घोंगावणारं संकट मोडून काढण्यासाठी आपल्याला एकजुटीने लढावं लागेल. सत्ताधाऱ्यांनी आजवर आपल्या भावनांचा केवळ वापर केला. आता विचाराने चालण्याची वेळ आली आहे,” असे ते म्हणाले. बीडच्या सभेला जमलेली प्रचंड गर्दी पाहून सत्ताधारी बेजार झाले आहेत, आता अशीच एकजूट आपल्याला मुंबईत दाखवायची आहे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी त्यांनी प्रशासनालाही खडे बोल सुनावले. “आज आम्हाला डीजे लावू दिला नाही, यापुढे बीडमध्ये कुणाचाही डीजे वाजू देणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला. तसेच, पोलिसांना उद्देशून ते म्हणाले, “सत्ता येत-जात असते, त्यामुळे देवेंद्र फडणवीसांच्या चुकीच्या आदेशांचे पालन करू नका.”

देवेंद्र फडणवीसांवर टीकेची झोड

मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. “मराठा आणि कुणबी एकच असल्याचे सरकारने मान्य करूनही आणि ५८ लाख नोंदी सापडूनही आरक्षण का दिले जात नाही? मागणी नसताना २९ जातींना ओबीसीत घेतले जाते, पण मराठ्यांची हक्काची मागणी का पूर्ण होत नाही? ही पोटदुखी कशासाठी?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

“फडणवीसांचा डीएनए ओबीसी असेल, तर मग शेतकरी ओबीसी नाही का? त्यांच्यासाठी कर्जमाफी का नाही? फडणवीस मराठा आणि ओबीसी समाजात भांडणे लावण्याचा प्रयत्न करत आहेत, पण त्यांचे हे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत,” असेही जरांगे म्हणाले.

“आरक्षणासाठी प्राणाचीही पर्वा नाही”

“ही शेवटची लढाई आहे. मुंबईत शांततेत जायचं आणि आपलं हक्काचं आरक्षण घेऊनच परतायचं. सरकार आपल्या मोर्चात घुसखोरी करून दगडफेक घडवून आणू शकते, पण आपण सावध राहायचे आहे,” असे त्यांनी मराठा बांधवांना सांगितले. “मराठा आरक्षणासाठी मी माझं आयुष्य पणाला लावलं आहे. उद्या फडणवीसांनी माझ्या अंगाचं कातडं जरी मागितलं, तरी तेही द्यायला तयार आहे. जातीसाठी मरण आलं तरी बेहतर!” अशा भावनिक शब्दांत त्यांनी आपला निर्धार व्यक्त केला.

पंतप्रधान मोदींनाही घातली साद

यावेळी जरांगे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही उल्लेख केला. देवेंद्र फडणवीसांना उद्देशून ते म्हणाले, “आमच्यावर वार करणे थांबवा. तुमच्या एका चुकीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही डाग लागू शकतो. तुमचं राजकीय करिअर उद्ध्वस्त झालंच आहे, पण आता पश्चातापाची वेळ येऊ देऊ नका.”

मुंबईकरांना मदतीचे आवाहन

“मुंबईकरांनो, आम्ही तुम्हाला त्रास द्यायला येत नाही, तर न्यायासाठी येतोय. आम्हीही हिंदू संस्कृती जपतो, तुमचा आणि आमचा गणपती बाप्पा एकच आहे. उलट, आम्ही तुम्हाला गणेशोत्सवात एक लाख स्वयंसेवक देऊ,” असे म्हणत त्यांनी मुंबईकरांना सहकार्याचे आवाहन केले.

लक्ष्मण हाकेंचे गंभीर आरोप

एकीकडे जरांगे पाटील यांनी सरकारविरोधात रणशिंग फुंकले असताना, दुसरीकडे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी जरांगे यांच्या आंदोलनावर गंभीर आरोप केले आहेत. “मनोज जरांगे यांचा मोर्चा सरकार पुरस्कृत आहे. मतदार संघात एक बैठक घेण्यासाठी आमदार त्यांना १० ते १५ लाख रुपये देतात. आरक्षणाच्या माध्यमातून मराठा समाजाला व्यवस्था ताब्यात घ्यायची आहे,” असा आरोप हाके यांनी केला आहे.

आता २९ ऑगस्ट रोजी मनोज जरांगे यांच्या ‘चलो मुंबई’ आंदोलनावर राज्य सरकार काय भूमिका घेणार आणि मराठा समाजाच्या मागण्या मान्य होणार का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed