रायगड: मालमत्तेवरून किंवा जुन्या वादातून होणाऱ्या कौटुंबिक हत्यांच्या घटनांनी समाजमन सुन्न होत असताना, रायगड जिल्ह्यातील म्हसळा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सततच्या टोमण्यांना आणि आईकडे वाईट नजरेने बघण्याच्या संशयाला कंटाळून एका १८ वर्षीय नातवानेच आपल्या ७२ वर्षीय आजोबांची निर्घृण हत्या केली. धक्कादायक म्हणजे, या हत्येला दुसऱ्याच कोणा व्यक्तीने केल्याचा बनाव रचून नातवाने पोलिसांची दिशाभूल करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मात्र, पोलिसांच्या एका प्रश्नाने त्याचा हा बनाव फसला आणि या हत्येमागील क्रूर सत्य उघड झाले.

म्हसळा, रायगड : म्हसळा शहरातील खांदा मोहल्ला परिसरात राहणारे शौकत अली परदेशी (वय ७२) यांची गुरुवारी, ३१ जुलै रोजी संध्याकाळी राहत्या घरी अज्ञात व्यक्तीने हत्या केल्याची माहिती म्हसळा पोलीस स्टेशनला मिळाली. माहिती मिळताच पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी आणि नंतर जवळच्या सरकारी रुग्णालयात धाव घेतली, जिथे शौकत यांना मृत घोषित करण्यात आले होते.

 

 

नातवाचा बनाव आणि पोलिसांचा संशय

प्राथमिक तपासात, मृत शौकत यांचा १८ वर्षीय नातू, मोहम्मद अजगर अली परदेशी याने पोलिसांना माहिती दिली की, एका अज्ञात व्यक्तीने घरात घुसून आजोबांची हत्या केली. त्याने सांगितले की, “आजोबा शौकत त्यांच्या खोलीत एकटेच झोपले होते, तेव्हा तोंडाला कापड बांधलेली एक व्यक्ती घरात घुसली. त्या व्यक्तीने धारदार शस्त्रांनी आजोबांच्या डोक्यावर आणि मानेवर वार केले. मी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता, त्याने माझ्यावरही हल्ला केला आणि पळून गेला.” या झटापटीत आपल्या डाव्या हाताला जखमा झाल्याचेही मोहम्मदने पोलिसांना सांगितले.

मोहम्मदच्या या जबाबामुळे, सुरुवातीला पोलिसांचा तपास अज्ञात व्यक्तीच्या दिशेने सुरू झाला. मात्र, हत्येची पद्धत आणि मोहम्मदच्या हातावरील जखमा बघून पोलिसांना संशय आला. शौकत यांची लोखंडी रॉड आणि सुऱ्याने अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. अशा स्थितीत, आरोपीचा प्रतिकार करणाऱ्या मोहम्मदच्या हातावर केवळ किरकोळ जखमा कशा असू शकतात, हा प्रश्न पोलिसांना पडला. शिवाय, मोहम्मद उजव्या हाताने काम करणारा असताना त्याच्या डाव्या हाताला जखमा कशा झाल्या, यावरून पोलिसांचा संशय अधिकच बळावला.

अखेर नातवानेच दिली गुन्ह्याची कबुली

पोलिसांनी परिसरातील लोकांशी बोलून शौकत आणि मोहम्मद यांच्या नात्याबद्दल अधिक माहिती काढली असता, त्यांच्यात रोज वाद होत असल्याचे समोर आले. या माहितीच्या आधारे पोलिसांनी मोहम्मदची कसून चौकशी केली. “हातावर एवढ्या किरकोळ जखमा कशा?” या पोलिसांच्या प्रश्नावर मोहम्मद उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. अखेरीस, पोलिसांनी खाक्या दाखवताच तो कोसळला आणि त्यानेच आजोबांची हत्या केल्याची कबुली दिली.

म्हसळा हत्येमागील धक्कादायक कारण

काही वृत्तांनुसार, मोहम्मद हा मानगाव येथील एका हायस्कूलमध्ये शिकत होता. “तू कितीही शिकलास तरी तुझं काही होणार नाही,” असे म्हणून आजोबा शौकत त्याला सतत टोमणे मारायचे. याशिवाय, आजोबा आपल्या आईकडे वाईट नजरेने बघतात, असा त्याचा गैरसमज झाला होता. या दोन्ही कारणांमुळे त्याच्या मनात आजोबांविषयी प्रचंड राग होता आणि याच रागातून त्याने त्यांना संपवण्याचा निर्णय घेतला.

गुरुवारी संध्याकाळी आजोबा गाढ झोपेत असल्याची खात्री करून, मोहम्मदने लोखंडी रॉडने त्यांच्या डोक्यावर आणि चाकूने गळ्यावर वार केले. इतकेच नाही, तर त्याने आजोबांच्या दोन्ही मनगटाच्या नसाही कापल्या. यानंतर, पोलिसांना संशय येऊ नये म्हणून त्याने एका अनोळखी व्यक्तीने हत्या केल्याचा फिल्मी बनाव रचला आणि स्वतःच्या हातावर चाकूने वार करून घेतले.

म्हसळा पोलिसांनी मोहम्मदला ताब्यात घेतले असून, त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आणखी कोणी सामील आहे का, याचा पोलीस अधिक तपास करत आहेत. मात्र, केवळ टोमण्यांमुळे आणि संशयामुळे नातवानेच आजोबांचा जीव घेतल्याच्या या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed