मुंबई: डोक्यावर पांढरी टोपी, अंगात पांढरा सदरा-सलवार आणि पायात पांढरी चप्पल, वाढलेली पांढरी दाढी आणि गर्दीतून अलगद उंचावणारा हात, चेहऱ्यावर हास्य आणि सुटकेचे भाव… हे दृश्य होते कुख्यात गुन्हेगार ते आमदार असा प्रवास केलेल्या अरुण गवळीच्या सुटकेनंतरचे. तब्बल १७ वर्षांनंतर अरुण गवळी तुरुंगाबाहेर आला आहे. शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या गवळीला सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. एका तुटलेल्या बंदुकीच्या ट्रिगरमुळे उलगडलेल्या या हाय-प्रोफाइल हत्येचा घटनाक्रम आणि त्यामागील राजकीय थरार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
काय होते प्रकरण?
ही घटना आहे २ मार्च २००७ च्या संध्याकाळची. घाटकोपरमधील असल्फा व्हिलेजच्या रुमानी मंझिल चाळीत शिवसेनेचे नवनिर्वाचित नगरसेवक कमलाकर जामसंडेकर आपल्या घरी टीव्ही पाहत होते. घरात त्यांची मुले आणि भाची मनाली हिरे उपस्थित होत्या. मनाली स्वयंपाकघरात असताना अचानक गोळीबाराचा आवाज आला. त्यांनी धावत बाहेर येऊन पाहिले असता, त्यांचे मामा कमलाकर जामसंडेकर रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. मारेकऱ्यांनी घरात घुसून अगदी जवळून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेने संपूर्ण मुंबई हादरली होती. कारण, केवळ महिनाभरापूर्वी झालेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत जामसंडेकर यांनी अरुण गवळीच्या अखिल भारतीय सेनेचे उमेदवार अजित राणे यांचा अवघ्या ३६७ मतांनी पराभव केला होता. त्यामुळे या हत्येला राजकीय संघर्षाची किनार होती.

एका तुटलेल्या ट्रिगरने लावला छडा
साकीनाका पोलिसांनी तपास सुरू केला आणि सुरुवातीला सहा संशयितांना अटक केली, पण हत्येचा मुख्य सूत्रधार पोलिसांच्या हाती लागत नव्हता. वर्षभरानंतर, २६ एप्रिल २००८ रोजी पोलिसांना काळबादेवी येथील एका ज्वेलरी शॉपवर दरोडा पडणार असल्याची टीप मिळाली. पोलिसांनी सापळा रचून हॉटेल गोविंदराममधून अशोक कुमार जयस्वाल, विजय गिरी, अनिल गिरी आणि नरेंद्र गिरी या चार जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे एक गावठी कट्टा सापडला, ज्याचा ट्रिगर तुटलेला होता.
हाच तुटलेला ट्रिगर जामसंडेकर हत्याकांडाचा सर्वात मोठा दुवा ठरला. घटनास्थळाच्या तपासणीत पोलिसांना एक तुटलेला ट्रिगर सापडला होता, जो या कट्ट्याचाच होता. यानंतर दरोड्याच्या तयारीत असलेल्या आरोपींनीच जामसंडेकर यांची हत्या केल्याचे स्पष्ट झाले.
हत्येची सुपारी आणि दगडी चाळीचे कनेक्शन
पोलिसांनी आरोपींची कसून चौकशी केली असता, या हत्येमागील कट उघड झाला. जामसंडेकर यांच्यावर गोळी झाडणारे सापडले होते, पण त्यांच्यामागे कोण होते, हे शोधणे बाकी होते. तपासात अजित राणे आणि प्रताप गोडसे या अखिल भारतीय सेनेच्या कार्यकर्त्यांची नावे समोर आली. त्यांनी बांधकाम व्यावसायिक सदाशिव सुर्वे आणि जामसंडेकरांचा जुना सहकारी साहेबराव भिंताडे यांच्या सांगण्यावरून ही ३० लाख रुपयांची सुपारी घेतली होती. जमिनीच्या वादातून आणि राजकीय वैमनस्यातून सुर्वे आणि भिंताडे यांनी जामसंडेकरांना संपवण्याचा कट रचला होता.
परंतु, या कटाचा अंतिम आदेश दगडी चाळीतून येणार होता. सर्व सूत्रधार भायखळ्याचे तत्कालीन आमदार आणि अखिल भारतीय सेनेचे अध्यक्ष अरुण गवळी उर्फ ‘डॅडी’ यांना भेटले. दगडी चाळीतील कार्यालयात झालेल्या बैठकीत ३० लाखांची सुपारी निश्चित झाली. शूटर नरेंद्र गिरी आणि विजय गिरी यांना प्रत्येकी अडीच लाख रुपये देण्याचे ठरले आणि ॲडव्हान्स म्हणून २० हजार रुपये देण्यात आले. १५ दिवस पाळत ठेवल्यानंतर मारेकऱ्यांनी जामसंडेकर यांची घरात घुसून हत्या केली.
गवळीला अटक आणि जन्मठेप आणि अरुण गवळी जामीन
या खुलाशानंतर मे २००८ मध्ये पोलिसांनी दगडी चाळीत घुसून अरुण गवळीला अटक केली. सर्व आरोपींवर ‘मोक्का’ लावण्यात आला. अनेक अयशस्वी जामीन अर्जांनंतर, २०१२ मध्ये मुंबई सत्र न्यायालयाने अरुण गवळीसह ११ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली, जी उच्च न्यायालयानेही कायम ठेवली.
गेली १७ वर्षे गवळी तुरुंगात होता. या काळात त्याला काही वेळा पॅरोल आणि फर्लो मंजूर झाला. मात्र, जामसंडेकर हत्या प्रकरणात जामीन अर्ज सातत्याने फेटाळला जात होता. अखेर, वयाची ७६ वर्षे आणि प्रलंबित असलेले अपील विचारात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला आहे.
एकेकाळी शिवसेनेला राजकीय आव्हान देणाऱ्या अरुण गवळीने बाळासाहेब ठाकरे यांना आव्हान देत ‘अखिल भारतीय सेना’ नावाचा पक्ष काढला होता. जामसंडेकर हत्या प्रकरण हे गवळी आणि शिवसेना यांच्यातील संघर्षाचे एक रक्तरंजित पान ठरले. या प्रकरणामुळे एक आमदार आणि ‘डॅडी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गवळीला जन्मठेपेची शिक्षा झाली, ज्याने मुंबईच्या गुन्हेगारी आणि राजकीय जगतात मोठी खळबळ उडवून दिली होती. आता १७ वर्षांनंतर गवळीच्या सुटकेमुळे त्या जुन्या जखमा पुन्हा ताज्या झाल्या आहेत.
