बेळगाव, कर्नाटक: केवळ शाळेचे मुख्याध्यापक मुस्लिम समाजाचे आहेत, या धार्मिक द्वेषातून त्यांची बदली व्हावी या हेतूने शाळेच्या पाण्याच्या टाकीत कीटकनाशक मिसळून तब्बल ४१ मुलांच्या जीवाशी खेळण्याचा धक्कादायक प्रकार कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यात उघडकीस आला आहे. या अमानुष कटामध्ये श्रीराम सेनेच्या तालुकाध्यक्षासह तिघांना अटक करण्यात आली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी, १२ मुलांना विषबाधा झाल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करावे लागले.
बेळगाव शाळा विषप्रयोग नेमके काय घडले?
ही खळबळजनक घटना बेळगाव जिल्ह्यातील सवदत्ती तालुक्यातील हुलीकट्टी गावातील सरकारी प्राथमिक शाळेत घडली. १४ जुलै रोजी शाळेतील मुले नेहमीप्रमाणे पाण्याच्या टाकीवर पाणी पिण्यासाठी गेली असता, त्यांना पाण्यातून विचित्र वास येत असल्याचे जाणवले. मुलांनी तातडीने ही गोष्ट शिक्षक आणि मुख्याध्यापक सुलेमान गोरेनायक यांच्या कानावर घातली. शिक्षकांनी तात्काळ मुलांना टाकीतील पाणी पिण्यास मनाई केली.
मात्र, तोपर्यंत काही विद्यार्थ्यांनी ते पाणी प्यायले होते. या मुलांना काही वेळातच मळमळ आणि चक्कर येण्याचा त्रास सुरू झाला. गेल्या दोन आठवड्यांपासून अशा प्रकारे आजारी पडणाऱ्या मुलांची संख्या वाढत होती. एकूण १२ विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे उपचारानंतर त्यांची प्रकृती स्थिर आहे.
बेळगाव प्रकरणाचा असा झाला कटाचा पर्दाफाश
घटनेचे गांभीर्य ओळखून मुख्याध्यापक आणि संतप्त पालकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी शाळेच्या परिसराची पाहणी केली असता, त्यांना पाण्याच्या टाकीजवळ एका शीतपेयाच्या (सॉफ्ट ड्रिंक) बाटलीत कीटकनाशक आढळून आले. फॉरेन्सिक तपासात बाटलीतील आणि टाकीच्या पाण्यातील रसायन एकच असल्याचे सिद्ध झाले.
पोलिसांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता, पाचवीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने आपणच हे रसायन टाकीत ओतल्याची कबुली दिली. कृष्णा मदर नावाच्या व्यक्तीने चॉकलेट आणि ५०० रुपयांचे आमिष दाखवून आपल्याकडून हे कृत्य करून घेतल्याचे त्याने सांगितले. या माहितीच्या आधारे पोलिसांनी कृष्णा मदरला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने सागर पाटील हा या कटाचा मुख्य सूत्रधार असल्याचे सांगितले.
धार्मिक द्वेष हेच मुख्य कारण
पोलिसांच्या माहितीनुसार, सागर पाटील हा श्रीराम सेनेचा तालुकाध्यक्ष असून, त्यानेच हा संपूर्ण कट रचला होता. शाळेचे मुख्याध्यापक सुलेमान गोरेनायक हे मुस्लिम समाजाचे असल्याने त्यांची बदली व्हावी, असा त्याचा उद्देश होता. शाळेत एखादी मोठी दुर्घटना घडल्यास त्याचा ठपका मुख्याध्यापकांवर येईल आणि जनक्षोभामुळे त्यांची बदली होईल, या विकृत विचारातून सागरने हे कृत्य केले. सागर पाटील, कृष्णा मदर आणि नगनगवडा पाटील या तिन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
मुख्यमंत्र्यांकडून निषेध
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. “धार्मिक कट्टरता आणि जातीय द्वेष किती घृणास्पद पातळीवर जाऊ शकतो, याचे हे उदाहरण आहे. या घटनेत निष्पाप मुलांचे हत्याकांड झाले असते,” असे म्हणत त्यांनी आरोपींवर कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली असून, धार्मिक द्वेषातून मुलांच्या जिवावर उठलेल्या या नराधमांवर कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.