“मराठीचा मुद्दा मुंबईपुरता, भाजपलाच होईल फायदा”; राजकीय विश्लेषक उदय निरगुडकर यांचे मोठे विधान

 

मुंबई: राज्यात हिंदी भाषेच्या सक्तीवरून सुरू झालेल्या वादानंतर राज आणि उद्धव ठाकरे या दोन भावांच्या एकत्र येण्याने राजकीय वातावरण तापले आहे. मात्र, हा भावनिक मुद्दा आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयार केलेला एक ‘स्क्रिप्टेड’ राजकीय डाव असून, याचा अंतिम फायदा भाजपलाच होईल, असे सडेतोड विश्लेषण प्रसिद्ध राजकीय विश्लेषक आणि सेफॉलॉजिस्ट उदय निरगुडकर यांनी केले आहे. त्यांच्या मते, मराठी अस्मितेच्या मुद्द्याला जेवढी हवा दिली जाईल, तेवढेच अमराठी मतांचे ध्रुवीकरण भाजपच्या बाजूने होईल.

 

 

 

 

‘हे सर्व स्क्रिप्टेड, पटकथा लेखक देवेंद्र फडणवीस’

 

“हे सगळं वाल्मिकीने आधी लिहिलं आणि नंतर रामायण घडत गेलं, अशा प्रकारची ही परिस्थिती आहे,” असे म्हणत निरगुडकर यांनी यामागे मोठ्या राजकीय पटकथेचा संशय व्यक्त केला. त्यांच्या मते, सरकारच्या त्रिभाषा सूत्राचा संदिग्ध अध्यादेश येणे, त्यानंतर लगेच राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेणे, त्याला उद्धव ठाकरेंनी सकारात्मक प्रतिसाद देणे, दोन्ही पक्षांनी आंदोलनात उतरणे आणि त्याच वेळी देवेंद्र फडणवीस व राज ठाकरे यांची भेट होणे, हा घटनाक्रम योगायोग नाही. “जो नाना फडणविसांसारखा चतुर आणि बाजीरावासारखा धाडसी आहे, तोच याचा स्क्रिप्ट रायटर असू शकतो,” असे म्हणत त्यांनी या सर्व घडामोडींमागे देवेंद्र फडणवीस असल्याची शक्यता अप्रत्यक्षपणे वर्तवली.


 

मराठी मतांच्या ध्रुवीकरणाचा भाजपलाच फायदा?

 

निरगुडकर यांच्या मते, मराठी भाषेचा मुद्दा मुंबई आणि ठाण्याच्या पलीकडे फारसा प्रभावी ठरणार नाही. उलट, मुंबईत या मुद्द्यामुळे ‘रिव्हर्स पोलरायझेशन’ होण्याची दाट शक्यता आहे. “तुम्ही जेवढी मराठी सेंटिमेंट गोळा करायला जाल, तेवढी मुंबईमध्ये नॉन-मराठी सेंटिमेंट अधिक तीव्रतेने गोळा होतील आणि त्याचा थेट फायदा भारतीय जनता पक्षाला मिळेल. त्यामुळे हा मुद्दा हाती घेण्यामागे भाजपचीच रणनीती असू शकते,” असे ते म्हणाले.


 

मुंबईची बदललेली भाषिक समीकरणे

 

या विश्लेषणाला आधार देताना निरगुडकर यांनी मुंबईच्या बदललेल्या लोकसंख्येची (डेमोग्राफी) आकडेवारी मांडली.

  • २००१ ते २०११ या काळात मुंबईत हिंदी बोलणाऱ्यांची संख्या ४० टक्क्यांनी वाढली, तर मराठी बोलणाऱ्यांचा टक्का १ टक्क्याने घसरला.
  • महाराष्ट्राच्या इतर भागांतून मुंबईत येणाऱ्या स्थलांतरितांचे प्रमाण ५ टक्क्यांनी घटले, तर देशाच्या इतर भागांतून येणाऱ्यांचे प्रमाण कित्येक पटीने वाढले.
  • याच काळात गुजराती भाषिकांचा टक्का कमी झाला आहे.

ही बदललेली समीकरणे लक्षात घेता, केवळ भाषिक मुद्द्यावर निवडणूक जिंकणे आता सोपे राहिलेले नाही.


 

‘मराठी माणसाची अनास्था हेच मूळ कारण’

 

“भाषेसाठी आपण मीरा-भाईंदरमध्ये चप्पल हातात घेतली, पण त्याचवेळी पायातली कोल्हापुरी चप्पल ‘प्राडा’ या आंतरराष्ट्रीय ब्रँडने पळवली,” असे मार्मिक उदाहरण देत निरगुडकर यांनी मराठी माणसाच्या अनास्थेवर बोट ठेवले. त्यांच्या मते, “तमिळ किंवा बंगाली माणसाला आपल्या भाषेबद्दल जो अभिमान आणि चिकटून राहण्याची वृत्ती आहे, ती मराठी माणसात, विशेषतः उच्च वर्गात कमी दिसते. षण्मुखानंद हॉल दाक्षिणात्य बांधव उभा करू शकतात, पण तसा भव्य हॉल मराठी माणसाला का उभा करता आला नाही? आपली भाषा टिकवायची असेल, तर तिची आर्थिक आणि सांस्कृतिक ताकद वाढवावी लागेल. राजकीय इच्छाशक्ती, प्रभावी अधिकारी वर्ग आणि सामाजिक एकत्रता या तीनही पातळ्यांवर आपण कमी पडत आहोत,” असे परखड मत त्यांनी मांडले.


 

मुंबई महापालिका निवडणुकीत कोणाला फटका, कोणाला फायदा?

 

आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निरगुडकर यांनी पुढील शक्यता वर्तवल्या आहेत:

  • भाजप: पक्षाचे महत्त्व निश्चितच वाढेल आणि ते सर्वात मोठा पक्ष म्हणून आपले स्थान अधिक भक्कम करतील.
  • उद्धव ठाकरे: त्यांना या निवडणुकीत मोठा फटका बसू शकतो, कारण त्यांची मूळ व्होट बँक विभागली गेली आहे.
  • राज ठाकरे: “किंग नाही, पण किंगमेकर” होण्याच्या भूमिकेत असतील. त्यांची उपयुक्तता सिद्ध करून ते आपले राजकीय महत्त्व वाढवतील.
  • एकनाथ शिंदे: एक “स्ट्रीट स्मार्ट” नेते म्हणून त्यांनी मुंबईत आपली ताकद वाढवली आहे. राज ठाकरेंसोबत त्यांची युती होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
  • काँग्रेस: मुंबईत नेतृत्वाचा चेहरा नसल्यामुळे पक्षाला आपला जनाधार टिकवण्यासाठी मोठी कसरत करावी लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed