शिंदे गट  गट स्वबळावर लढण्याच्या तयारीत? फडणवीसांकडून ठाकरेंना ऑफर, राजकीय वर्तुळात नव्या समीकरणांची चर्चा

मुंबई: राज्यात पुन्हा एकदा नव्या राजकीय समीकरणांची नांदी होताना दिसत आहे. एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेसोबत युतीची घोषणा करून ‘शिवशक्ती-भीमशक्ती’चा नवा अध्याय सुरू केला आहे, तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत उद्धव ठाकरेंना सूचक ऑफर दिल्याने राजकीय भुवया उंचावल्या आहेत. या घडामोडींमुळे महायुतीत सर्वकाही आलबेल नसल्याची चर्चा सुरू झाली असून, शिंदे गट स्वबळावर लढण्याची तयारी करत आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

 

 

 

 

शिंदे गट -आंबेडकर एकत्र, फडणवीसांची ठाकरेंना साद

 

बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेसोबत युतीची घोषणा केली. “बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा घेऊन चालणारी शिवसेना आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या रक्ताचा वारसा घेऊन चालणारी रिपब्लिकन सेना, त्यामुळे आमचं चांगलं जमेल,” असे शिंदे म्हणाले. २०१९ मध्ये उद्धव ठाकरेंनी प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीसोबत केलेल्या प्रयोगाची आठवण करून देणारा हा प्रयत्न आहे.

त्याच दिवशी विधान परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना उद्देशून, “२०२९ पर्यंत आम्हाला तिकडे यायचा स्कोप नाही, पण तुम्हाला इकडे यायचा स्कोप आहे. त्याबद्दल वेगळा विचार करू,” असे विधान केले. हे वक्तव्य जरी गमतीत केले असले तरी त्याचे राजकीय अर्थ काढले जात आहेत. यानंतर शिंदे आणि ठाकरे यांचे फोटोसेशनवेळी समोरासमोर येणे आणि त्यांच्यातील अवघडलेपण महाराष्ट्राने पाहिले. या सर्व घटनाक्रमामुळे महायुतीत बिघाडी होऊन शिंदे गट वेगळा मार्ग निवडण्याच्या तयारीत आहे का, यावर चर्चा सुरू झाली आहे.


 

भाजपकडून शिंदे गटाला एकटे लढण्याचा संदेश?

 

शिंदे गटाचे मंत्री सातत्याने अडचणी निर्माण करत असल्याने ते महायुतीत अस्वस्थ असल्याच्या बातम्या येत होत्या. त्यातच शिंदे यांनी अचानक दिल्ली दौरा करून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली. आताच्या घडामोडी पाहता भाजपनेच शिंदे यांना एकटे लढण्याचा संदेश दिला आहे का, अशी शक्यता वर्तवली जात आहे. याची काही प्रमुख कारणे आहेत:

  • मुंबई महापालिकेवर एकहाती वर्चस्वाची लढाई: मुंबई महापालिकेवर आपला झेंडा फडकवणे हे भाजपचे प्रमुख लक्ष्य आहे. मात्र, महायुतीत जागावाटपावरून भाजप आणि शिंदे सेनेत संघर्ष होण्याची दाट शक्यता आहे. मुख्यमंत्री म्हणून दोन वर्षांत शिंदे यांनी ‘कॉमन मॅन’ अशी प्रतिमा तयार करून स्वतःचे अस्तित्व निर्माण केले आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतही त्यांनी जागावाटपात तडजोड केली नव्हती. त्यामुळे मुंबई महापालिकेतही ते आपला हक्क सोडणार नाहीत, हे स्पष्ट आहे. शिंदे यांची वाढती बार्गेनिंग पॉवर भाजपसाठी डोकेदुखी ठरू शकते. त्यामुळे जागावाटपाचा वाद टाळण्यासाठी आणि शिंदे यांच्यावर अन्याय झाल्याचा ठपका लागू नये, यासाठी भाजपने त्यांना स्वतंत्र लढण्याचा मार्ग सुचवला असण्याची शक्यता आहे.
  • ठाणे, कल्याण-डोंबिवलीत वर्चस्वाची स्पर्धा: ठाणे हा शिंदे यांचा बालेकिल्ला आहे, पण भाजप येथे पुन्हा आपले वर्चस्व निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहे. आमदार संजय केळकर यांच्या माध्यमातून मोर्चेबांधणी आणि गणेश नाईक यांना मंत्रिपद देऊन भाजपने शिंदे यांना शह देण्यास सुरुवात केली आहे. कल्याण-डोंबिवलीतही श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात स्थानिक भाजपची नाराजी उघड आहे. रवींद्र चव्हाण यांना प्रदेशाध्यक्षपद देऊन भाजपने येथील कार्यकर्ते सक्रिय केले आहेत. मीरा-भाईंदर, नाशिक आणि संभाजीनगरमध्येही भाजपने शिंदे गटाला बाजूला सारून पक्षबांधणी सुरू केली आहे.
  • २०२९ साठी स्वबळाची रंगीत तालीम: ‘शत-प्रतिशत भाजप’ हे पक्षाचे अंतिम ध्येय आहे. २०२९ मध्ये स्वबळावर सत्ता आणण्यासाठी भाजपला संपूर्ण महाराष्ट्रात आपली ताकद आजमावणे आवश्यक आहे. आगामी महापालिका निवडणुका ही त्यासाठी एक उत्तम संधी आहे. या निवडणुका स्वतंत्रपणे लढल्यास भाजपला आपली खरी ताकद आणि कमकुवत दुवे ओळखता येतील. ही एक प्रकारे २०२९ च्या निवडणुकीची रंगीत तालीम ठरू शकते. त्यामुळे “महापालिका स्वतंत्र लढा, सत्तेवेळी युतीचा विचार करू,” असा संदेश दिल्लीतून शिंदे यांना देण्यात आल्याची चर्चा आहे.

एकंदरीत, आनंदराज आंबेडकरांसोबतची युती ही शिंदे यांची स्वबळावर लढण्याची तयारी असू शकते. भाजपच्या वाढत्या महत्त्वाकांक्षेमुळे आणि स्थानिक पातळीवरील संघर्षामुळे शिंदे गट महायुतीतून बाहेर पडून स्वतःचा मार्ग निवडणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed