दिल्लीत ठरली रणनीती? मुंबईत महायुती, पण राज्याच्या इतर भागात भाजप स्वबळावर लढणार!

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे राज्यात मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चांना उधाण आले असताना, आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात एक मोठी बातमी समोर येत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची घेतलेली भेट या चर्चांना नवी दिशा देणारी ठरली आहे. या भेटीत आगामी महापालिका आणि इतर स्थानिक निवडणुकांसाठी भाजपची रणनीती निश्चित झाल्याचे कळते. यानुसार, मुंबई महानगरपालिकेची निवडणूक महायुती म्हणून एकत्रित लढवली जाईल, परंतु मुंबईबाहेर इतर ठिकाणी भाजप ‘एकला चलो रे’ची भूमिका घेत स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याची दाट शक्यता आहे.

 

 

मंत्रिमंडळ बदलाच्या चर्चेला दुय्यम महत्त्व

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर वादग्रस्त मंत्र्यांना डच्चू मिळणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र, त्याच वेळी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या दिल्लीवारीने आणि शहा यांच्यासोबतच्या बैठकीने या चर्चांना वेगळे वळण दिले आहे. या बैठकीत स्थानिक निवडणुका हाच मुख्य अजेंडा होता, ज्यामुळे भाजपचा खरा रोख आगामी सत्तासमीकरणांवर असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मुंबईत महायुती, बाहेर स्वबळ: काय आहे भाजपची रणनीती?

भाजपने आखलेल्या या दुहेरी रणनीतीमागे मोठा राजकीय हिशोब असल्याचे मानले जाते.

१. शिंदे गटाची बार्गेनिंग पॉवर कमी करणे:

मुंबई महापालिका जिंकणे हे भाजप, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शिंदे गट या तिन्ही पक्षांसाठी प्रतिष्ठेचे आहे. ठाणे, कल्याण-डोंबिवली येथील आपले वर्चस्व दाखवून शिंदे गट मुंबईत भाजपवर अधिक जागांसाठी दबाव टाकू शकतो. मात्र, याच शहरांमध्ये भाजपने स्वबळाचा नारा दिल्यास मुंबईतील जागावाटपात शिंदे गटाची सौदा करण्याची शक्ती (Bargaining Power) आपोआप कमी होईल. पक्ष आणि चिन्ह सोबत असले तरी मुंबईतील मतदार अद्याप पूर्णपणे शिंदे यांच्यामागे उभा नसल्याने, भाजपला सोडून स्वबळावर लढण्याचा धोका शिंदे गट पत्करणार नाही. त्यामुळे शिंदे गटाची कोंडी करण्याची ही भाजपची खेळी मानली जात आहे.

२. वाढलेली ताकद आणि आत्मविश्वास:

विधानसभा निवडणुकीत १३२ जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरल्यानंतर भाजपचा आत्मविश्वास दुणावला आहे. पुणे, नाशिक, ठाणे, मीरा-भाईंदर अशा महत्त्वाच्या शहरांमध्ये इतर पक्षांतील मोठे नेते भाजपमध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे या शहरांमध्ये मित्रपक्षांशिवाय स्वबळावर सत्ता मिळवता येईल, असा विश्वास भाजपला वाटत आहे. २०२९ पर्यंत स्वबळावर पूर्ण बहुमत मिळवण्याच्या ध्येयाचा भाग म्हणून स्थानिक पातळीवर ताकद आजमावणे भाजपसाठी महत्त्वाचे आहे.

मुंबईत मात्र महायुती का गरजेची?

राज्याच्या इतर भागात स्वबळाचा नारा देणारा भाजप मुंबईत मात्र मित्रपक्षांना सोबत घेण्यास तयार आहे, याची काही ठोस कारणे आहेत.

  • मराठी-अमराठी मतांचे गणित: हिंदी भाषेच्या सक्तीच्या मुद्द्यावरून मुंबईत मराठी विरुद्ध अमराठी असा वाद निर्माण झाला आहे. अमराठी मतदार भाजपसोबत असले तरी, केवळ त्यांच्या जीवावर मुंबई जिंकणे कठीण आहे. त्यामुळे मराठी मतांमध्ये विभाजन टाळण्यासाठी आणि काही प्रमाणात मराठी मते मिळवण्यासाठी शिंदे गटाची साथ भाजपला आवश्यक आहे.
  • ठाकरे ब्रँडचे आव्हान: जर भविष्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले, तर या एकत्रित ‘ठाकरे ब्रँड’ला एकट्याने सामोरे जाणे भाजपसाठी आव्हानात्मक ठरू शकते. त्यामुळे महायुतीतील सर्व पक्ष एकत्र असल्यास या आव्हानाला प्रभावीपणे तोंड देता येईल.
  • अल्पसंख्याक मते: मुंबईत काही प्रमाणात मुस्लिम मतांचे विभाजन करण्यासाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची मदत होऊ शकते.

एकंदरीत, मुख्यमंत्री फडणवीस यांचा दिल्ली दौरा हा केवळ मंत्रिमंडळ फेरबदलापुरता मर्यादित नसून, त्यामागे राज्याच्या राजकारणाची पुढील दिशा ठरवणारी व्यापक रणनीती असल्याचे स्पष्ट होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed