ठाणे:शहापूर, १० जुलै
शहापूर, १० जुलै: ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथील एका नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत, मासिक पाळी तपासण्याच्या बहाण्याने अल्पवयीन विद्यार्थिनींना विवस्त्र केल्याची अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापिकेसह आठ महिलांवर लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, मुख्याध्यापिका आणि एका महिला कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे पालकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
नेमकं काय घडलं?
शहापूर शहरातील आर. एस. दमाणी या नामांकित इंग्रजी शाळेत मंगळवारी, ८ जुलै रोजी हा प्रकार घडला. शाळेच्या स्वच्छता कर्मचारी (मावशी) यांना मुलींच्या स्वच्छतागृहात रक्ताचे डाग आढळले. त्यांनी ही माहिती मुख्याध्यापिका माधुरी गायकवाड यांना दिली.
यानंतर, मुख्याध्यापिका गायकवाड यांनी इयत्ता पाचवी ते दहावीच्या सर्व विद्यार्थिनींना शाळेच्या सभागृहात एकत्र बोलावले. तिथे प्रोजेक्टरवर स्वच्छतागृहातील रक्ताच्या डागांचे फोटो दाखवून, “तुमच्यापैकी कोणाला मासिक पाळी आली आहे?” अशी दरडावून विचारणा केली. अनेक मुली भीतीमुळे गप्प बसल्या. ज्या मुलींनी घाबरत कबुली दिली, त्यांच्या हाताचे ठसे घेण्यात आले.
सर्वात धक्कादायक म्हणजे, ज्या मुलींनी मासिक पाळी आली नसल्याचे सांगितले, त्यांना स्वच्छतागृहात नेऊन कपडे काढून तपासणी करण्याचे आदेश मुख्याध्यापिकांनी महिला कर्मचाऱ्यांना दिले. या आदेशानंतर, सुमारे १० ते १२ मुलींना त्यांची अंतर्वस्त्रे काढून तपासणीला सामोरे जावे लागले.
प्रकरण कसे उघडकीस आले आणि पालकांचा संताप
शाळेत झालेल्या या अपमानास्पद प्रकारामुळे मुलींना प्रचंड मानसिक धक्का बसला. घरी पोहोचल्यानंतर त्यांनी रडत-रडत आपल्या पालकांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. आपल्या मुलींसोबत झालेला हा प्रकार ऐकून पालक संतप्त झाले. त्यांनी एकमेकांशी संपर्क साधला असता, अनेक मुलींसोबत असे घडल्याचे उघड झाले.
दुसऱ्या दिवशी, बुधवारी (९ जुलै) सकाळी सर्व संतप्त पालकांनी शाळेत धाव घेत मुख्याध्यापिका माधुरी गायकवाड यांना घेराव घातला आणि जोरदार जाब विचारला. जोपर्यंत मुख्याध्यापिकेवर कारवाई होत नाही आणि त्या राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा पवित्रा पालकांनी घेतला.
पोलिसांची कारवाई आणि गुन्हा दाखल
पालकांचा वाढता संताप पाहून मुख्याध्यापिकांनी पोलिसांना पाचारण केले. शहापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र, पालक आपल्या मागण्यांवर ठाम होते. अखेर, पोलिसांनी मुख्याध्यापिकेला पोलीस ठाण्यात नेले. त्यानंतर पालकांनी आपला मोर्चा पोलीस ठाण्याकडे वळवला आणि तिथेच ठिय्या आंदोलन सुरू केले.
प्रकरणाचे गांभीर्य ओळखून, पोलिसांनी अखेर मुख्याध्यापिका माधुरी गायकवाड, पाच महिला शिक्षिका आणि व्यवस्थापन समितीतील दोन महिला, अशा एकूण आठ जणींविरोधात गुन्हा दाखल केला. त्यांच्यावर भारतीय न्यायसंहितेच्या कलम ७४, ७६ तसेच पॉक्सो कायद्याच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्याध्यापिका माधुरी गायकवाड आणि एका सफाई कर्मचारी महिलेला अटक करण्यात आली असून, इतर आरोपींना लवकरच ताब्यात घेतले जाईल. शाळा प्रशासनाने मुख्याध्यापिकेला तडकाफडकी निलंबित केले आहे.
या घटनेमुळे विद्यार्थिनी प्रचंड घाबरल्या असून त्यांच्या मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम झाला आहे. या नामांकित शाळेत घडलेल्या लाजिरवाण्या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.