माळशेज घाट: सोशल मीडियावरील रील्स आणि पावसाळी पर्यटनाच्या मोहापायी हवामान खात्याच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करणे पर्यटकांच्या कसे जीवावर बेतू शकते, याचा थरारक प्रत्यय शनिवारी प्रसिद्ध काळू धबधब्यावर आला. अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे काळू नदीच्या प्रवाहात सुमारे २५० पर्यटक अडकून पडले. यानंतर स्थानिक तरुण, पोलीस आणि वनविभागाने मिळून तब्बल आठ तास चाललेल्या थरारक बचावकार्यानंतर सर्वांना सुखरूप बाहेर काढले.
काळू धबधबा स्थळावर जीवघेणा प्रसंग
पुणे आणि मुंबईच्या जवळ असलेले काळू धबधबा हे ठिकाण पावसाळ्यात पर्यटकांचे प्रमुख आकर्षण ठरते. शनिवारी, २६ जुलै रोजी विकेंड साधून पुणे, मुंबई आणि अगदी हैदराबादमधूनही मोठ्या संख्येने पर्यटक येथे दाखल झाले होते. हवामान विभागाने घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा दिला होता, तसेच हा ट्रेक स्थानिक वाटाड्याशिवाय (गाईड) धोकादायक मानला जातो. मात्र, या दोन्ही सूचनांकडे दुर्लक्ष करून पर्यटकांनी सकाळीच खिरेश्वर, वाघाची वाडी या भागातून ट्रेकला सुरुवात केली.
सकाळच्या सत्रात पावसाचा जोर कमी असल्याने, सर्व पर्यटक कोणत्याही अडचणीशिवाय धबधब्यापर्यंत पोहोचले. निसर्गाचा आनंद घेऊन आणि फोटो काढल्यानंतर दुपारच्या सुमारास त्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला. मात्र, त्याचवेळी हवामानाने रौद्र रूप धारण केले.
अन् निसर्गाच्या कचाट्यात सापडले…
दुपारी बाराच्या सुमारास माळशेज परिसरात धुवाधार पावसाला सुरुवात झाली. अवघ्या काही तासांत झालेल्या प्रचंड पावसामुळे शांत दिसणारी काळू नदी दुथडी भरून वाहू लागली. पाण्याचा प्रवाह इतका प्रचंड वाढला की, नदी ओलांडून परत येणे अशक्य झाले. दोन्ही बाजूंचा संपर्क तुटल्याने सुमारे २५० पर्यटक जीव मुठीत धरून नदीच्या पलीकडे अडकून पडले.
देवदूतासारखे धावले स्थानिक आणि प्रशासन
अडकलेल्या पर्यटकांपैकी एकाने आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाला फोन करून माहिती दिल्यानंतर बचाव यंत्रणा कामाला लागली. टोकावडे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतल कुमार नाईक आणि वनविभागाचे पथक तातडीने घटनास्थळाकडे रवाना झाले. मात्र, त्याआधीच स्थानिक तरुण मदतीसाठी धावले.
मोरुशी गावातील भास्कर मेंगाळ यांना काही पर्यटक अडकल्याची माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहोचले. सुरुवातीला ७-८ पर्यटक असतील असा अंदाज होता, पण प्रत्यक्षात २५० जणांचा जमाव पाहून त्यांनी तातडीने गावातील इतर तरुणांना मदतीसाठी बोलावले. नदीचा प्रवाह जीवघेणा असतानाही, भास्कर मेंगाळ यांनी जीवाची पर्वा न करता पाण्यात उडी मारली आणि पोहून पलीकडची बाजू गाठली. त्यांनी तिथे दोरखंड (झिप लाईन) बांधून बचावकार्याची सुरुवात केली.
त्यानंतर पोलीस, वनविभागाचे कर्मचारी आणि कमलु पोकळा यांच्यासारखे अनेक स्थानिक तरुण मदतीला पोहोचले. दुपारी अडीच वाजता खऱ्या अर्थाने बचावकार्याला सुरुवात झाली. सुरुवातीला एकाच झिप लाईनवरून महिला आणि मुलांना बाहेर काढण्यास सुरुवात झाली. मात्र, पर्यटकांची संख्या जास्त असल्याने आणि प्रत्येकाला आधी सुटण्याची घाई लागल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. अखेर, दुसरी झिप लाईन बसवल्यानंतर बचावकार्याला वेग आला.
रात्रीच्या अंधारात, मुसळधार पावसात आणि पाण्याच्या प्रचंड वेगात तब्बल आठ तास हे बचावकार्य सुरू होते. अखेर रात्री साडेदहा वाजता शेवटच्या पर्यटकाला सुखरूप बाहेर काढण्यात आले आणि सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. या घटनेमुळे पावसाळी पर्यटनाला जाताना योग्य ती काळजी घेणे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे किती महत्त्वाचे आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.