मुंबई: एकेकाळी मुंबईच्या अंडरवर्ल्डसाठी कर्दनकाळ ठरलेले आणि ‘एन्काऊंटर स्पेशालिस्ट’ म्हणून ओळखले जाणारे दया नाईक हे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. पोलीस दलातून निवृत्त होण्याच्या केवळ चार दिवस आधी, पोलीस निरीक्षक पदावर असलेल्या दया नाईक यांना सहायक पोलीस आयुक्त (ACP) म्हणून बढती मिळाली. हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करणारा एक तरुण, ज्याने जिद्दीने शिक्षण पूर्ण केले आणि पुढे जाऊन गुन्हेगारी विश्वात स्वतःची दहशत निर्माण केली, त्या दया नाईक यांचा प्रवास एखाद्या थरारक चित्रपटालाही लाजवेल असा आहे.
दया नाईक यांची संघर्ष आणि शिक्षणाची जिद्द
उडपीच्या एका छोट्या गावातून आलेला, वडील सोडून गेलेले आणि आईसोबत माहेरी राहणारा एक मुलगा… हे दया नाईक यांचे बालपण. लहान वयातच त्यांनी मुंबई गाठली. १९८० च्या दशकात वरळीतील एका बारमध्ये त्यांना वेटरची नोकरी मिळाली. तेव्हा त्यांना ५०० रुपये पगार आणि तितकीच टीप मिळत असे. त्या काळात महिन्याला हजार रुपये कमावणारा हा तरुण निम्मे पैसे आपल्या आईला पाठवायचा आणि उरलेल्या पैशात शिक्षणाची स्वप्ने पाहायचा.
त्यांची अभ्यासाची आवड पाहून हॉटेलच्या मालकाने त्यांना नाईट स्कूलमध्ये दाखल केले. पुढे त्यांनी दहावी, बारावी आणि नंतर प्लंबरची कामे करत एमएससीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षण झाले, पण वेटरचे काम सुटले नव्हते. दारू सर्व्ह करणारा हा मुलगा एमएससी आहे, हे ऐकून अनेकांना आश्चर्य वाटायचे.
खाकी वर्दीतील प्रवेश आणि पहिला एन्काऊंटर
एके रात्री त्यांनी पीएसआय (PSI) परीक्षेचा फॉर्म भरण्याचा निर्णय घेतला आणि दादरच्या एका अभ्यासिकेत अभ्यासाला लागले. प्रचंड मेहनतीच्या जोरावर त्यांनी पीएसआयची पोस्ट मिळवली. त्यांची पहिली पोस्टिंग जुहूच्या डिटेक्शन विंगमध्ये झाली. पण शांतपणे नोकरी करणाऱ्या दया नाईक यांच्या आयुष्याला एका घटनेने कलाटणी दिली.
एके दिवशी छोटा राजन टोळीचे दोन गुंड रस्त्यावर दादागिरी करत होते. दया नाईक यांनी थेट त्यांच्यावर हात टाकला आणि त्यांना बेदम मारले. एका नव्या सब-इन्स्पेक्टरने दाखवलेले हे धाडस पाहून तत्कालीन पोलीस उपायुक्त सत्यपाल सिंह यांनी त्यांची बदली थेट सीआययू (CIU) ब्रांचमध्ये केली. तिथे त्यांचे वरिष्ठ होते इन्स्पेक्टर प्रदीप शर्मा.
एके दिवशी बबलू श्रीवास्तव टोळीचे दोन गुंड येणार असल्याची टीप प्रदीप शर्मा यांना मिळाली. त्या चकमकीत दया नाईक यांच्या पिस्तुलातून पहिल्यांदा गोळ्या सुटल्या आणि दोन गुंड ठार झाले. इथूनच दया नाईक यांच्या नावासोबत ‘एन्काऊंटर स्पेशालिस्ट’ हे बिरुद कायमचे जोडले गेले.
असा बनला ‘एन्काऊंटर स्पेशालिस्ट’
यानंतर दया नाईक यांनी मागे वळून पाहिले नाही. रफीक डब्बेवाला, सादिक कालिया, श्रीकांत मामा, विनोद भटकर, परवेज सिद्दीकी अशा एकापाठोपाठ एक गुंडांचा खात्मा करत त्यांनी ८० हून अधिक एन्काऊंटर केले. दोन्ही हातांनी बंदूक चालवणारा शार्प शूटर सादिक कालिया याचा भर दादर मार्केटमध्ये केलेला खात्मा विशेष गाजला. या चकमकीत दया नाईक यांच्या मांडीला गोळी लागली होती, तरीही त्यांनी सादिकला ठार केले. त्यांच्या नावाची दहशत इतकी वाढली की, अंधेरीत त्यांच्या गाडीत बॉम्ब ठेवण्यात आला, ज्यातून ते थोडक्यात बचावले.
दया नाईक यांची प्रसिद्धी, बॉलिवूड आणि वादाची सुरुवात
दया नाईक यांची ही लाईफस्टोरी बॉलिवूडसाठी आकर्षणाचा विषय ठरली. त्यांच्या प्रसिद्धीच्या काळातच त्यांनी आपल्या गावात शाळा बांधण्याचा निर्णय घेतला. पण याच शाळेच्या उद्घाटनामुळे त्यांच्यावर संकटाची मालिका सुरू झाली. शाळेच्या उद्घाटनाला बॉलिवूडमधील अनेक मोठे सेलिब्रिटी हजर होते, ज्यामुळे एका पोलीस अधिकाऱ्याकडे एवढा पैसा कुठून आला, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.
त्यांच्यावर चौकशी आयोग बसवण्यात आला. अखेर २००६ साली बेहिशोबी मालमत्तेच्या आरोपाखाली अँटी करप्शन ब्रांचने (ACB) त्यांना अटक केली. दोन महिने तुरुंगात काढल्यानंतर तब्बल पाच वर्षे त्यांना निलंबित ठेवण्यात आले.
निलंबन, तुरुंगवास आणि पुनरागमन
ही लढाई तिथेच संपली नाही. २००९ मध्ये त्यांच्यावर कारवाईसाठी परवानगी देण्यास तत्कालीन डीजीपी एस. एस. विर्क यांनी नकार दिला. २०१० साली सर्वोच्च न्यायालयानेही त्यांच्यावरील आरोप फेटाळले आणि ते पुन्हा पोलीस दलात रुजू झाले. २०१८ मध्ये त्यांना पोलीस निरीक्षक म्हणून बढती मिळाली. मनसुख हिरेन प्रकरणात त्यांची गोंदियाला बदली झाली, पण ते पुन्हा मुंबई पोलीस दलात परतले.
आणि आता, आपल्या वादळी कारकिर्दीच्या शेवटी, निवृत्तीच्या उंबरठ्यावर असताना त्यांना सहायक पोलीस आयुक्त (ACP) पदावर बढती मिळाली आहे. मुंबईतील अंडरवर्ल्ड संपले असले तरी, दया नाईक यांची ही थरारक कहाणी आजही मुंबईच्या कट्ट्यांवर चर्चिली जाते.