छत्रपती संभाजीनगर: शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातील एका लॉजमध्ये ३० वर्षीय विवाहित महिलेवर सामूहिक अत्याचार (Gangrape) झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. केवळ रूम नंबर चुकल्याने एका नर्सला नराधमांच्या विकृतीचा सामना करावा लागला. मात्र, वेदांतनगर पोलिसांनी सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासाच्या आधारे अवघ्या तीन तासांत तिन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
नेमकं प्रकरण काय?
पीडित महिला ही एका खाजगी रुग्णालयात नर्स म्हणून कार्यरत आहे. आर्थिक अडचणीत असल्याने तिने भोकरदन येथील एका मित्राकडे मदत मागितली होती. १७ डिसेंबर रोजी दोघेही छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन जवळ भेटले. त्यानंतर त्यांनी स्टेशन परिसरातील ‘हॉटेल ग्रेट पंजाब’ येथे रूम नंबर १०५ बुक केली. तिथे दोघांनी मद्यप्राशन आणि जेवण केले. रात्री ११ वाजेच्या सुमारास पीडित महिला फोनवर बोलण्यासाठी रूमच्या बाहेर पडली.
मद्याच्या नशेत असल्याने परतताना महिलेचा गोंधळ झाला आणि ती रूम नंबर १०५ ऐवजी दुसऱ्या मजल्यावरील रूम नंबर २०५ जवळ पोहोचली. तिने चुकून त्या रूमचे दार वाजवले.

‘तुमचा मित्र आतच आहे’ म्हणत ओढले आत
सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आलेल्या माहितीनुसार, महिलेने चुकून दार वाजवल्यानंतर तिला आपली चूक उमजली होती. ती ‘सॉरी’ म्हणून तिथून निघून जात असतानाच, रूम नंबर २०५ मधील एका आरोपीने बाहेर येत तिला “तुमचा मित्र आतच आहे, तुम्ही आत या” असे खोटे सांगितले. महिला आत शिरताच या तिघांनी तिला पकडून ठेवले, जबरदस्तीने पुन्हा बिअर पाजली आणि तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. पहाटे ४ वाजेपर्यंत हा प्रकार सुरू होता.
पोलिसांनी असा लावला छडा
पहाटे शुद्धीवर आल्यानंतर पीडित महिलेने तातडीने वेदांतनगर पोलीस ठाणे गाठून आपबिती सांगितली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने हॉटेल गाठले.
-
सीसीटीव्ही फुटेज: फुटेजमध्ये आरोपींचे चेहरे स्पष्ट दिसले.
-
बुकिंग डिटेल्स: आरोपींनी एका मोबाईल नंबरवरून बुकिंग केले होते, जो तांत्रिक तपासात कळीचा मुद्दा ठरला.
-
अटक: पोलिसांनी अवघ्या ३ तासांत शोध मोहीम राबवून जिन्सी मुंडा आणि भानुदास नगर भागातून तिन्ही आरोपींना अटक केली.
अटक करण्यात आलेले आरोपी:
१. घनश्याम भाऊलाल राठोड (२५ वर्षे) २. ऋषिकेश तुळशीराम चव्हाण (२७ वर्षे) ३. किरण लक्ष्मण राठोड (२५ वर्षे)
यातील दोन आरोपी खाजगी फायनान्स कंपनीत वसुलीचे काम करतात, तर एक जण शिक्षण घेत आहे. हे तिघेही अविवाहित असून घटनेनंतर फोन बंद करून पसार झाले होते.
तपासात पुढे काय?
महिलेसोबत आलेला मित्र मद्याच्या नशेत असल्याने त्याला या घटनेचा पत्ता लागला नाही. सकाळी उठल्यावर महिला घरी गेली असावी, असे समजून तो ही निघून गेला होता. सध्या तिन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून त्यांच्यावर गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत अन्य कोणाचा सहभाग आहे का, याचा अधिक तपास वेदांतनगर पोलीस करत आहेत.
वेदांतनगर पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे या नराधमांना अवघ्या काही तासांत गजाआड करण्यात यश आले आहे.
