गाझियाबाद सुसाईड case

गाझियाबाद, उत्तर प्रदेश: “तुम्ही तुमच्या दुसऱ्या लग्नासाठी स्वतःच्या मुलांच्या आनंदाचा गळा घोटलात. तुम्हाला बाबा म्हणायला सुद्धा मला आवडत नाही. आमच्या मृतदेहांना हात लावू नका,”… मृत्यूला कवटाळण्यापूर्वी एका बहिणीने लिहिलेले हे शब्द काळीज पिळवटून टाकत आहेत. उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये एका उच्चभ्रू कुटुंबातील उच्चशिक्षित भावा-बहिणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वडिलांच्या आणि सावत्र आईच्या छळाला कंटाळून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे मृत्युपूर्वी लिहिलेल्या २२ पानी सुसाईड नोटमधून उघड झाले आहे.

 

गाझियाबाद सुसाईड case

 

काय आहे गाझियाबाद मधील नेमकी घटना?

गाझियाबादच्या कवीनगर भागातील गोविंदपुरम कॉलनीमध्ये राहणारा २८ वर्षीय अविनाश कुमार सिंह हा दिल्लीत गुप्तचर विभागात (Intelligence Bureau) अधिकारी होता, तर त्याची २५ वर्षांची बहीण अंजली नोएडातील एका नामांकित एक्सपोर्ट कंपनीत टीम लीडर होती. गुरुवारी, ३१ जुलै रोजी दोघांनी राहत्या घरी विषारी पदार्थ (सल्फोस) खाऊन आपले जीवन संपवले.

ही घटना तेव्हा उघडकीस आली, जेव्हा त्यांची सावत्र आई रितू सिंह घरी पोहोचली. तिने दरवाजा वाजवून आणि फोन करूनही आतून काहीच प्रतिसाद न मिळाल्याने शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा तोडण्यात आला. त्यावेळी अविनाश आणि अंजली दोघेही जमिनीवर निपचित पडलेले दिसले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

सुसाईड नोटमधून वडिलांना जाब आणि गंभीर आरोप

सुरुवातीला पोलिसांना घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट सापडली नाही. मात्र, मृत अंजलीने आत्महत्येपूर्वी आपल्या डायरीतील २२ पानांचे फोटो काढून व्हॉट्सॲपवरून वडील सुखवीर सिंह, सावत्र आई रितू आणि आपल्या मामांना पाठवले होते. या नोटच्या आधारे त्यांच्या मामाने पोलिसांत तक्रार दाखल केली, त्यानंतर या प्रकरणाचा धक्कादायक खुलासा झाला. अंजलीने आपल्या नोटमध्ये लिहिले आहे:

“आमच्या मृत्यूसाठी आमची सावत्र आई रितू आणि वडील सुखवीर सिंह यांच्याशिवाय दुसरे कोणीही जबाबदार नाही. मुलांना जन्म देणे आणि त्यांची फी भरणे एवढेच वडिलांचे कर्तव्य नसते, तर त्यांना समजून घेणे आणि त्यांच्यासोबत वेळ घालवणेही महत्त्वाचे असते. तुम्ही माझ्या भावाला इतका त्रास दिला की तो मित्रांसोबत कुठे फिरकायलाही जाऊ शकला नाही.”

अंजलीने सावत्र आईवर गंभीर आरोप करताना म्हटले आहे की, तिने तिच्या चारित्र्यावर संशय घेतला आणि तिची बदनामी केली, तरीही तिचे वडील गप्प बसले.

मित्रासाठी भावनिक संदेश

अंजलीने आपल्या मित्राला उद्देशून एक भावनिक संदेशही लिहिला आहे. तिने आपल्या ‘महिम’ नावाच्या मित्राला शेवटचे विधी करण्याचा हक्क दिला आहे.

“महिम, आमच्या वाईट काळात तूच मोठा आधार दिलास. माझ्या आणि माझ्या भावाच्या मृतदेहाला अग्नी देण्याचा हक्क फक्त तुझा आहे. माझ्या आई-वडिलांना किंवा इतर कोणालाही आमच्या मृतदेहांना हात लावू देऊ नकोस. माझ्या बँक खात्यातील सर्व पैसे तू ठेव. मी घरातील वाद आणि कलह आता सहन करू शकत नाही.”

हत्येचा आरोप आणि कौटुंबिक छळाचा इतिहास

या प्रकरणात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. भावंडांचे मामा देवेंद्र सिंह यांनी तक्रारीत म्हटले आहे की, त्यांची बहीण (अविनाश-अंजलीची आई) कमलेश यांनीही २००७ मध्ये सुखवीर सिंह आणि रितू यांच्या प्रेमसंबंधांना आणि छळाला कंटाळून आत्महत्या केली होती. कमलेशच्या मृत्यूनंतर वर्षभरातच सुखवीर यांनी रितूशी लग्न केले आणि त्यानंतर त्यांनी दोन्ही मुलांचा छळ सुरू केला, ज्यामुळे ती अनेक वर्षे आपल्या मावशीकडे राहत होती.

पोलिसांचा तपास सुरू

सध्या, कवीनगर पोलीस सुसाईड नोट आणि मामाच्या तक्रारीच्या आधारे वडील सुखवीर सिंह आणि सावत्र आई रितू यांची कसून चौकशी करत आहेत. उच्चशिक्षित आणि स्वतःच्या पायावर उभे असलेल्या या भावंडांच्या आत्महत्येने समाजात खळबळ उडाली असून, या प्रकरणामागे कौटुंबिक छळाशिवाय आणखी काही कारण आहे का, याचाही पोलीस शोध घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed